लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी) पूर्वपरीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून त्यानुसार ही परीक्षा येत्या २१ मार्चला होणार आहे. याशिवाय, २७ मार्च आणि ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतला.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने येत्या रविवारी (१४ मार्च) होणारी राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय बुधवारी रात्री उशिरा जाहीर केला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना परीक्षेची नवीन तारीख २४ तासांत जाहीर केली जाईल, असे सांगून आंदोलक विद्यार्थ्यांनी आश्वस्त केले होते. त्यानुसार आयोगाने शुक्रवारी परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या.
यंदा अद्याप मागणीपत्र नाहीराज्य शासनाच्या विविध विभागांमधील गट-अ व गट-ब प्रवर्गातील रिक्तपदांसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून आयोगाला मागणीपत्र सादर केले जाते. दरवर्षी हे मागणीपत्र ऑक्टोबरमध्ये दिले जाते. मात्र, यंदा एकाही विभागाकडून एकाही जागेसाठी मागणीपत्र आयोगाला पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी परीक्षा कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पडळकर यांच्यासह नऊ जण अटकेतएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर केलेल्या अघोषित आंदोलनाचे नेते बनलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटक केली. मध्यरात्री पोलिसांनी त्यांची जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परीक्षांचे वेळापत्रक२१ मार्चराज्य सेवा पूर्वपरीक्षा २७ मार्चअभियांत्रिकी परीक्षा ११ एप्रिल महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा