शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट; अखेर नायगाव बीडीडी पुनर्विकासाचा नारळ फुटला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:27 AM2022-01-05T06:27:41+5:302022-01-05T06:27:52+5:30

‘चाळ क्रमांक ५ ब’च्या पाडकामाला सुरुवात, अखेर नायगाव बीडीडी  पुनर्विकासाचा नारळ फुटला 

Finally, Naigaon BDD redevelopment started | शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट; अखेर नायगाव बीडीडी पुनर्विकासाचा नारळ फुटला 

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट; अखेर नायगाव बीडीडी पुनर्विकासाचा नारळ फुटला 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : दुसऱ्यांसाठी अंगभर कापडं बनवणाऱ्यांचे गिरणगाव. तेथे काम करणारे चाळीत राहणारे लोक. त्यांच्यासाठी आहे त्या राहत्या जागेवर टुमदार घर मिळणे ही कल्पनाच मुळी स्वर्ग दोन बोटे..! मात्र मंगळवारी शंभर वर्षाचा इतिहास जपून ठेवलेली वास्तु पाडली जात असताना तेथे राहणाऱ्यांना 'सुतावरून स्वर्गात' जात असल्याचे भास झाले नसतील तर नवल...! लाखो देशवासीयांची सुताची गरज एकेकाळी निगुतीने भागविणाऱ्या कुटुंबांची छताची गरज आकाशी झेप घेत असताना "शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट" याचा आनंदानुभव घेत, जुन्या आठवणींना भरल्या डोळ्यांनी वाट काढून देत, नायगावच्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी एक अनोखा दिवस अनुभवला.

१९२२ साली बांधण्यात आलेल्या चाळ क्र ५ ब च्या पाडकामाला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या  उपस्थितीत मंगळवारी सुरुवात झाली.  सुमारे १०० वर्षे जुन्या चाळींतील इमारतींच्या पुनर्विकासाद्वारे रहिवाशांना सुविधांयुक्त घर देऊन जीवनमानाचा दर्जा उंचावण्याबाबत वर्षांपासून पाहिलेले स्वप्न  प्रत्यक्षात साकारले जाणार आहे.  या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण केले जाईल, असे यावेळी मंत्री आव्हाड यांनी सांगितले.  

बीडीडी चाळींच्या प्रत्येक दगडाला इतिहास असून सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची साक्ष देणाऱ्या या चाळी आहेत. 
चाळ क्रमांक ५ ब  पाडल्यानंतर रिक्त जागी नव्या इमारतींच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात येत आहे. आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्पाकरिता शासनाने म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. 

म्हाडातर्फे वरळी, ना. म. जोशी मार्ग - परळ येथील प्रकल्पाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, वरळी येथे पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाला प्रारंभही झाला आहे.

 नायगाव  बीडीडी चाळी तळ अधिक ३ मजल्यांच्या ४२ चाळी अस्तित्वात
त्यामध्ये एकूण ३,३४४ रहिवासी वास्तव्यास
nप्रकल्पाकरिता वास्तुशास्त्रज्ञ सल्लागार म्हणून संदीप शिर्के अँड असोसिएट्स यांची नियुक्ती
nप्रकल्पाचे कंत्राटदार म्हणून एल. अँड टी. कन्स्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती 
पहिला टप्पा :  नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्लॉट ब मधील २३ चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे.
दुसरा टप्पा : उर्वरित प्लॉट अ मधील १९ चाळींचा पुनर्विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे.
२२ मजल्यांच्या 
पुनर्वसन इमारती
प्रकल्पामध्ये ३ बेसमेंट   स्टील्ट   २२ मजल्यांच्या पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींच्या बांधकामांच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी दिली आहे. 

नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच जलद गतीने पूर्ण करून मार्गी लावला जाईल. 
    - जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

Web Title: Finally, Naigaon BDD redevelopment started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.