मुंबई - छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देऊन विक्री केल्या जाणाऱ्या संभाजी बिडीचे नाव अखेर बदलले आहे. विविध शिवप्रेमी संघटनांकडून होत असलेल्या तीव्र विरोधानंतर या विडीचे उत्पादक असलेल्या कंपनीने काही महिन्यांपूर्वी या उत्पादनाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता ही विडी नव्या नावासह बाजारात येऊ घातली आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड तसेच इतर शिवप्रेमी संघटनांच्या दीर्घकालीन लढ्याला अखेर यश आलं आहे.संभाजी बिडीचं नाव बदलावं, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी या बिडीच्या उत्पादकांवर निषेध, आंदोलने तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा देऊन दबाव आणला जात होता. नाव बदलण्याच्या निर्णयामुळे आतापर्यंत संभाजी बिडी या नावाने विकली जाणारी विडी आता साबळे बिडी या नावाने विकली जाणार आहे. विविध शिवप्रेमी संघटना आणि लोकभावनेचा मान राखून आम्ही या उत्पादनाचे नाव बदलले असल्याचे या साबळे-वाघिरे कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी सांगितले.विविध संघटना आणि जनतेच्या विरोधामुळे संभाजी बिडीची उत्पादक असलेल्या साबळे-वाघिरे कंपनीने या बिडीचे नाव बदलण्याची घोषणा केली होती. तसेच हे नाव अचानक बदलता येणार नाही. त्यासाठी काही काळ लागेल, अशी विनंती कंपनीने केली होती. त्यानुसार आता संभाजी बिडीचं नाव बदलून साबळे बिडी असं करण्यात आलं आहे.