मुंबई : शहर भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रखडवणाऱ्या मे . रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा.ली. या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर अखेर मुंबई महापालिकेने मंगळवारी नवी निविदा काढली. १३६२ कोटी ३४ लाख रुपये खर्चाची ही निविदा असून शहर भागातील २१२ रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिकेने ३९७ किमीच्या ९१० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या कामासाठी जानेवारी २०२३ मध्ये पाच कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आला होता. ९१० कामांपैकी मागील ११ महिन्यात १२३ कामे सुरु झाली आहेत. मात्र ७८७ कामांना अजून मुहूर्त मिळालेला नाही. शहर भागात तर अजून एकाही कामाचा पत्ता नाही. या भागातील काम नियोजित वेळेत सुरु न केल्याबद्दल पालिकेने मे .रोडवे सोल्युशन इन्फ्रा प्रा.ली. या कंपनीला ५२ कोटींचा दंड ठोठावून कंत्राट रद्द केले होते.
कामे सुरु न झाल्याबद्दल माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. रस्ते कंत्राटात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर भाजपचे दक्षिण मुंबईतील नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनीही कामे रखडल्याबद्दल आयुक्तांना पत्र लिहून कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने कंत्राटदाराला करणे दाखवा नोटीस पाठवली. त्यावर कंत्राटदाराने स्पष्टीकरण दिले. मात्र ते स्पष्टीकरण पालिकेला पटले नाही. त्यानंतर पालिकेने त्याला सुनावणीसाठी बोलावले. मात्र तो सुनावणीस हजार राहिला नाही. त्यानंतर पालिकेने कंत्राट रद्द केले. ० काँक्रिटीकरणाचा खर्च शहर १,३६२ कोटी ३४ लाख ६ हजार, पूर्व उपनगर ८४६ कोटी १७ लाख ६१ हजार, पश्चिम उपनगर परिमंडळ : ३ - १२२३ कोटी ८४ लाख ८३ हजार, परिमंडळ : ४ - १६३१ कोटी १९ लाख १८ हजार, परिमंडळ : ७ - ११४५ कोटी १८ लाख ९२ हजार, रस्त्यांची किलोमीटर कामे शहर विभाग ७२ किमी पूर्व उपनगर ७० किमी पश्चिम उपनगर २५३.६५ किमी