अखेर लोअर परळ पादचाऱ्यांसाठी पूल खुला; वाहतुकीसाठी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 06:06 AM2018-07-27T06:06:59+5:302018-07-27T06:09:47+5:30

लोअर परळ पूल उभारणीबाबत ‘तू-तू, मैं-मैं’ कायम

Finally open the pool for lower level pedestrians; Stop the traffic | अखेर लोअर परळ पादचाऱ्यांसाठी पूल खुला; वाहतुकीसाठी बंदच

अखेर लोअर परळ पादचाऱ्यांसाठी पूल खुला; वाहतुकीसाठी बंदच

Next

मुंबई : तमाम मुंबईकरांना तब्बल ५२ तास वेठीस धरल्यानंतर अखेर धोकादायक लोअर परळ पुलाचा भाग पादचाºयांसाठी शुक्रवारी सकाळी खुला करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. करी रोड जंक्शन येथून लोअर परळ स्थानकापर्यंतचा महापालिका हद्दीतील भाग पादचाºयांसाठी खुला करण्यात आला आहे. तथापि, वाहतुकीसाठी लोअर परळ पूल बंदच राहणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.
स्थानिक राजकीय नेते, महापालिका, वाहतूक पोलीस आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सकाळी केलेल्या पाहणीनंतर एन.एम. जोशी मार्गावरील डिलाईल पुलाबाबत (लोअर परळ रेल्वे पूल) नाइलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.
गुरुवारी सकाळी गर्दीचे योग्य नियंत्रण केल्यामुळे प्रवाशांना तुलनेने कमी गर्दीचा सामना करावा लागला होता. मात्र प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयाच्या अभावामुळे गेले दोन दिवस मुंबईकर मेटाकुटीला आले होते. त्यानंतर गुरुवारी पूल पादचाºयांसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आयआयटीच्या नेतृत्वाखाली मुंबईतील रेल्वे पुलांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १७ जुलैला केलेल्या पाहणीनंतर लोअर परळ पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्याचा अहवाल आयआयटीने रेल्वेकडे सोपवला. त्यानुसार पाहणीत लोअर परळ पूल धोकादायक असल्याने बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने महापालिकेला केल्या. त्यानंतर २४ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून या पुलावर पादचाºयांसह सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती.

आराखड्यासंदर्भात उद्या बैठक
बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुलाच्या तांत्रिक मुद्द्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता होती. मात्र तसे काहीच घडले नसल्याचे रेल्वे पूल अधिकाºयांनी रेल्वे मुख्यालयाला कळवले. यामुळे आता शनिवारी, २८ जुलै रोजी पश्चिम रेल्वे मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत पुलाचे पाडकाम, आवश्यक ब्लॉक, नवीन पुलाचा आराखडा या मुद्द्यांवर चर्चा होईल.

‘सेकंड ओपिनियन’ नाहीच
अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने सर्व पुलांच्या पाहणीस सुरुवात केली. मात्र याचवेळी सेकंड ओपिनियन म्हणून आयआयटीतील तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. आयआयटीच्या अहवालानुसार पूल धोकादायक ठरला आहे. यामुळे पुलाच्या पाहणीसाठी महापालिकेने सुचविलेला ‘सेकंड ओपिनियन’साठी पुन्हा विशेष पथकाची निर्मिती करणे अयोग्य असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

सात दिवसांच्या आत पाडकामाची निविदा
लोअर परळ पूल धोकादायक असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेत पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. सात दिवसांच्या आत पाडकामासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.

जबाबदारी झटकली
लोअर परळ रेल्वे रुळावर पुलाचा भाग उतरत्या स्वरूपात असल्याने त्याची उभारणी धोकादायक पद्धतीने करण्यात आली. आयआयटीच्या अहवालानुसार, रुळावरील पुलाला आधार दिलेले लोखंडी खांब गंजले आहेत. तर सध्याच्या सुरक्षिततेच्या परिमाणानुसार नव्याने उभारण्यात येणाºया पुलाच्या उंचीत सुमारे १.५ मीटरपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. रेल्वे रुळापासून लोअर परळ पुलाची उंची सद्य:स्थितीत ५.१ ते ५.३ मीटर आहे. नव्याने उभारण्यात येणाºया पुलाचे खांब महापालिका हद्दीत असल्यामुळे सदर पुलाचे काम महापालिकेने करणे योग्य आहे, असे रेल्वे अधिकाºयांचे मत आहे. तर, महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार लोअर परळचा नवीन पूल रेल्वेनेच बांधणे अपेक्षित आहे.
 

Web Title: Finally open the pool for lower level pedestrians; Stop the traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.