हेमंत नगराळे मुंबईचे पोलीस आयुक्त; रजनीश सेठ यांच्याकडे पाेलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फाेटकांनी भरलेली कार तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कथित सहभागाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात बुधवारी मोठे फेरबदल करण्यात आले. वाझे यांना पाठीशी घालणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची होमगार्डचे महासंचालक म्हणून उचलबांगडी करण्यात आली. तर राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. बुधवारी सायंकाळी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस संजय पांडे यांची होमगार्डमधून राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून या नव्या बदलांची माहिती दिली.
स्फोटक कार प्रकरणी एनआयए कडून येत्या काही दिवसांत परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांना आयुक्त पदावरून बाजूला करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये अनपेक्षितपणे इतक्या मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले.
* डीजीपी ते मुंबई आयुक्त बनणारे नगराळे पहिले अधिकारी
पोलीस महासंचालक पदावरून मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. हेमंत नगराळे यांच्याकडे डीजीपीचा गेल्या सव्वा दोन महिन्यांंपासून तात्पुरता पदभार असला तरी यूपीएससी निवड समितीच्या शिक्कामोर्तब नंतर त्यांच्याकडे पद राहणार होते. मात्र त्यांच्याकडे अनपेक्षितपणे मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी आली. ते पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त होतील. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून १९ महिन्यांचा कार्यभार मिळेल. सरकारची इच्छा असल्यास त्यानंतरही त्यांना मुदतवाढ मिळू शकते.
* हेमंत नगराळे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी
हेमंत नगराळे हे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासनावर पकड असलेले अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नगराळे यांच्याकडे गेल्या ७ जानेवारीला पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. त्यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये मुंबईचे सहआयुक्त (प्रशासन) म्हणून तर जवळपास महिनाभर आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर २०१६ ते २०१८ या काळात ते नवी मुंबईचे आयुक्त होते. तेथून पदोन्नतीवर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांची विधी व तंत्रज्ञ विभागात महासंचालक पदावर बदली झाली. डीजीपीचा कार्यभार सांभाळत असताना अवघ्या ७० दिवसांत त्यांच्यावर मुंबई पोलीस दलाची धुरा सोपविण्यात आली.
* परमबीर सिंग यांची १३ महिन्यांत उचलबांगडी
सचिन वाझे प्रकरणात आयुक्त पदावरून गच्छंती झालेले परमबीर सिंग यांनी गेल्यावर्षी २९ फेब्रुवारीला मुंबईच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी कोरोना परिस्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, टीआरपी घोटाळा, अर्णब गोस्वामी प्रकरण हाताळले होते. त्यामुळे निवृत्तीपर्यंत म्हणजे ३० जून २०२२ पर्यंत तेच कार्यभार सांभाळतील अशी अपेक्षा होती. मात्र स्फोटक कार प्रकरणात मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेल्याने त्यांना पदावरुन हटविण्याशिवाय सरकारपुढे दुसरा पर्याय नव्हता.
* कोण आहेत रजनीश सेठ?
पोलीस महासंचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी साेपविण्यात आलेले रजनीश सेठ हे १९८८ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. गेल्यावर्षी २९ फेब्रुवारीपासून ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. यापूर्वी त्यांनी राज्याचे अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), गृह विभागाचे विशेष सचिव, मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांचा सेवा कार्यकाळ आहे.
* अखेर संजय पांडे यांचीही बदली
राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे गेल्या सहा वर्षांपासून होमगार्डमध्ये कार्यरत होते. परमबीर सिंग यांची त्या ठिकाणी बदली केल्याने पांडे यांची राज्य सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आली. या ठिकाणचा अतिरिक्त पदभार गेल्यावर्षीच्या ९ डिसेंबर पासून त्यांच्याकडेच होता.
* पोलीस दलाची प्रतिमा सुधारू - नगराळे
मुंबई पोलीस दल सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. त्यांचे मनोधैर्य वाढवून पूर्वीचा लौकिक मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नवीन आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर ते म्हणाले, ‘राज्य सरकारने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी स्वीकारली आहे. सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होईन. स्फोटक कार व मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए व एटीएसकडून सुरू आहे. त्यामुळे त्याबद्दल सध्या काही बोलणे अनुचित आहे’.
----------------------------