लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भीषण आपत्तीमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या पुन्हा १० ते १५ दिवस लांबणीवर पडल्या आहेत. सार्वत्रिक बदल्या ९ ऑगस्ट तर विशेष बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याची मुभा देण्यात आली आहे. ‘लोकमत’ने बुधवारी त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के बदल्या करण्याबद्दल सामान्य प्रशासनाकडून गुरुवारी अद्यादेश काढण्यात आले.
११ बढत्यांसह जवळपास ५० आयपीएस अधिकाऱ्यांसह व पीएसआय ते अधीक्षक(मपोसे) दर्जापर्यंतचे ५०० वर अधिकारी बदलीसाठी पात्र आहेत. त्यांच्यासह विनंतीवर बदलीसाठी अनेक जण इच्छुक आहेत.
एका पदावर किमान दोन वर्षे पूर्ण झालेल्यांमध्ये राज्य पोलीस दलातील ११ अप्पर महासंचालकांच्या तर ८ विशेष महानिरीक्षक, ७ एडीसीपी-डीआयजी आणि ३४ उपायुक्त, अधीक्षकांचा समावेश आहे. त्यापैकी काहींचा अपवाद वगळता सर्वांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ३० जूनपर्यंत सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती देण्यात आली होती. ३० जुलैपर्यत ‘जीटी’ व १५ ऑगस्टपर्यंत विशेष बदल्या करण्याचे निश्चित होते. मात्र कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाल्याने बदल्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.