मुंबई : मुंबई विद्यापीठाची १३ नोव्हेंबर रोजी होणारी विधि अभ्यासक्रमाची (लॉ) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. निकालाच्या गोंधळावर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुपारी कलिना कॅम्पस येथे केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने हे आश्वासन दिले आहे.रखडलेल्या निकालासाठी आक्रमक पवित्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी कलिना कॅम्पसमधील परीक्षा विभागाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. एकीकडे हिवाळी परीक्षा सुरू झाल्या असून अद्याप २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल व अनेक विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. निकाल आणि पुनर्मूल्यांकनाच्या निकालांत विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी, १३ नोव्हेंबरपासून सत्र परीक्षा घेतल्यास विधि अभ्यासक्रमातील बहुतेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत स्टुडंट लॉ कौन्सिल आणि छात्रभारती संघटनेसह अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनाबाहेर जोरदार आंदोलन केले. नवनियुक्त प्रकुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी विद्यार्थी संघटनांची भेट घेतली. पूनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर होईपर्यंत पुढे ढकलण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिले.
अखेर ‘लॉ’ची परीक्षा पुढे ढकलली, आंदोलनाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 4:55 AM