अखेर एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्चला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:09 AM2021-03-13T04:09:26+5:302021-03-13T04:09:26+5:30
आयोगाकडून परिपत्रक जारी; पुढील परीक्षाही नियोजनानुसारच लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ...
आयोगाकडून परिपत्रक जारी; पुढील परीक्षाही नियोजनानुसारच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली हाेती. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून त्यानुसार ही परीक्षा २१ मार्चला हाेईल. याशिवाय, २७ मार्च आणि ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.
कोरोनाचा संसर्ग आणि मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे मागच्या वर्षी कोणतीच परीक्षा होऊ शकली नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करुन रविवार, १४ मार्चला राज्य सेवेची पूर्व परीक्षा तर २७ मार्चला अभियांत्रिकी परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा ११ एप्रिलला घेण्याचे नियोजन केले. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांवर पोहोचवल्या. हॉल तिकिटांचे वाटप केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले. दरम्यान, राज्यात काेराेनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा अभिप्राय न घेताच बुधवारी रात्री उशिरा परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील आमदार, मंत्र्यांसह विरोधक व विद्यार्थी, विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. अखेर विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाशी चर्चा केली व येत्या आठ दिवसांत परीक्षेचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता २१ मार्च रोजी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
* यंदा अद्याप मागणीपत्र नाही
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील गट-अ व गट-ब प्रवर्गातील रिक्त पदांसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून आयोगाला मागणीपत्र सादर केले जाते. दरवर्षी हे मागणीपत्र ऑक्टोबर महिन्यात दिले जाते. मात्र, यंदा एकाही विभागाकडून एकाही जागेसाठी मागणीपत्र आयोगाला पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी परीक्षा कधी होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
-------------------------