Join us  

एमपीएससी अध्यक्षपदासाठी अखेर रजनीश सेठ; मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यपालांकडे दिला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 6:16 AM

या पदावर सेठ यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २१ सप्टेंबरच्या अंकात सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते.

मुंबई : राज्यातील नोकरभरतीची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी सध्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून, या नियुक्तीची शिफारस त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.

या पदावर सेठ यांची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २१ सप्टेंबरच्या अंकात सर्वांत आधी प्रसिद्ध केले होते.

या पदासाठी रजनीश सेठ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वनसेवेतील निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांच्या नावांचे पॅनल मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केले होते व तिन्ही नावांची शिफारस मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी रजनीश सेठ यांच्या नावास मान्यता देऊन राज्यपालांकडे शिफारस केली आहे. या आठवड्यात राज्यपाल रमेश बैस हे सेठ यांच्या नियुक्तीला मान्यता देतील असे म्हटले जात आहे.

 रजनीश सेठ हे पोलिस महासंचालकपदावरून येत्या डिसेंबर महिन्यात निवृत्त होणार होते; पण त्या आधीच एमपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलिस महासंचालकपदासाठी रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर

नवीन पोलिस महासंचालक कोण असतील याची चर्चा आता सुरू झाली आहे. सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आणि प्रज्ञा सरवदे यांची नावे चर्चेत आहेत. शुक्ला यांचे नाव आघाडीवर आहे. सरवदे या सध्या अपर पोलिस महासंचालक व पोलिस गृहनिर्माणच्या सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. 

शुक्ला या १९८८ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्याच्या सरकारच्या त्या विश्वासातील मानल्या जातात. फणसाळकर आणि सरवदे हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस आहेत. पुढील एक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार असल्याने सर्व परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेचाही महासंचालक नेमताना विचार होईल, असे म्हटले जाते.

मुंबई पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला यांना नेमायचे आणि फणसाळकर यांना पोलिस महासंचालकपद द्यायचे का, यावरही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. महासंचालक (कायदा व तांत्रिक) संदीप बिष्णोई आणि पोलिस महासंचालक (होमगार्ड) भूषणकुमार उपाध्याय हेही १९८९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पण, त्यांच्या निवृत्तीला सहा महिन्यांपेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे.