राणीच्या बागेत अखेर मध्यरात्री पाळणा हलला, नवजात पेंग्विनच्या 'नामकरणासाठी बालहट्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 11:02 AM2018-08-16T11:02:27+5:302018-08-16T11:32:19+5:30
येथील राणीच्या बागेत अखेर पाळणा हलला. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला आज बाळ झाले आहे. गेले 40 दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री त्यातून बेबी पेंग्वीन जन्मले आहे.
मुंबई – येथील राणीच्या बागेत अखेर पाळणा हलला. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला आज बाळ झाले आहे. गेले 40 दिवस अंड्याला ऊब दिल्यानंतर बुधवारी रात्री त्यातून बेबी पेंग्वीन जन्मले आहे. त्यामुळे बागेतील सर्व कर्मचाऱ्यांनाही आनंद झाला आहे. भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात अर्थात राणीच्या बागेत अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलला आहे. त्यामुळे आणखी छोटे पेंग्विन आई-बाबांसह पाण्यात सूर मारताना पाहता येणार आहेत.
आदित्य ठाकरेंनाही झाला आनंद
Our cute freedom baby! pic.twitter.com/v0ApNLDRwS
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 16, 2018
अडीच वर्षीय हेबोल्ट पेंग्विनच्या अंड्याला आज 40 दिवस पूर्ण झाले आहेत. पेंग्विनची अंडी फुटुन बाहेर येण्याचा कालावधी हा 40 ते 45 दिवस इतका असतो, असे राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले होते. स्वातंत्र्यदिनीच मुंबईतील पेंग्विन कुटुंबामध्ये चिमुकला पाहुणा येईल, याचे औत्सुक्य मुंबईकरांना लागले होते. तर पाळणा हलण्याची गोड बातमी पसरताच पेंग्विनच्या पिल्लाला आपणच सूचवलेले नाव ठेवावे, असा हट्ट एका चिमुरडीने धरला आहे. या चिमुकलीने चक्क राणी बाग प्रशासनाकडे आकर्षक नावांची यादीही पाठवली आहे.
दरम्यान, बंदिस्त वातावरणात जन्माला येणारे हे देशातील पहिले पेंग्विन ठरले आहे. या पिल्लाचे नाव मीच ठेवणार असा बालहट्ट अंधेरीतील 6 वर्षांच्या मिष्का मंगुर्डेकर हिने धरला आहे. मिष्का जुहू येथील बेसंट मॉन्टेसरी शाळेत पहिल्या वर्गात शिकते. तिने राणी बाग प्रशासनाला नावांची यादी पत्राने पाठवली आहे. पेंग्विनचे पिल्लू नर असल्यास त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह तिने धरला आहे.