Join us

अखेर पीएमसी बँक खातेदारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:06 AM

सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसला स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्याची तत्त्वत: मान्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ ...

सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसला स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्याची तत्त्वत: मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेली पीएमसी बँक ताब्यात घेण्यासाठी सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसला स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्याची तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

पीएमसी बँक म्हणजे पंजाब अँड महाराष्ट्र काे-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण २२ सप्टेंबर २०१९ रोजी समोर आले. लाखो लोकांचे परिश्रम, घाम गाळून कमावलेले पैसै, ठेवी, डिपॉझिट, बचत आणि भांडवलाच्या माध्यमातून या बँकेत जमा केले होते ते गाेठविण्यात आले.

पीएमसी बँकेने ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत कर्जाची परतफेड केली नव्हती तसेच कर्जाची रक्कम बँकेचे संचालक व पदाधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचे आरबीआयच्या निदर्शनाला येताच त्यांनी २३ सप्टेंबर २०१९ रोजी पीएमसी बँकेवर निर्बंध घातले. पुढे हे निर्बंध ३० जूनपर्यंत वाढवले होते.

खातेदारांना न्याय मिळावा, बँकेत अडकलेले पैसे परत मिळावेत, यासाठी गेली दीड वर्षे उत्तर मुंबईचे खासदार गाेपाळ शेट्टी प्रयत्नशील हाेते. बँकेतील खातेधारकांच्या ‘पीएमसी बैंक डिपॉझिटर्स असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून या बुडीत बँकेच्या खातेदारांना न्याय देण्याची मागणी त्यांनी लावून धरली हाेती.

अखेर १८ जून रोजी पीएमसी बँकेच्या ठेवीदारांना, ग्राहकांना न्याय देणारे आदेश जारी झाले. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या पत्रानुसार आता सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसला पीएमसी बँकेच्या टेकओवरचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी ‘लोकमत’ला दिली.

......................................