राज्यातील विद्यापीठांना अखेर दिलासा, निवडणूक प्रक्रियेसाठी २८ फेबु्रवारीपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 05:47 AM2017-11-22T05:47:04+5:302017-11-22T05:47:14+5:30
मुंबई : राज्यात लागू झालेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार, राज्यातील सर्व महाविद्यालयांना सिनेट निवडणुकांची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची होती.
मुंबई : राज्यात लागू झालेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार, राज्यातील सर्व महाविद्यालयांना सिनेट निवडणुकांची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची होती. पण, विद्यापीठांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे विद्यापीठांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २८ फेबु्रवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांना दिलासा मिळाला आहे.
अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी व नोंदणीकृत पदवीधर गटातून प्रत्येकी एक उमेदवार आरक्षण संवगार्तून निवडून द्यायचा आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. पण, सर्व विद्यापीठांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बराच वेळ लागेल. त्यामुळे यंदा या निवडणुका होणे शक्य नाही. या प्रक्रियेनंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका आहेत. यामुळे २०१७-१८ या वर्षाकरिता विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
>समितीच्या शिफारशी मंजूर
विद्यापीठांनी बृहत् आराखडे तयार करून त्यास शासनामार्फत महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची (माहेड) मान्यता घेण्याची तरतूद आहे. माहेडने बृहत् आराखड्याच्या तपासणीसाठी तज्ज्ञ समिती नेमून अहवाल माहेडला सादर केला. समितीच्या शिफारशी माहेडने मंजूर केल्या. त्यानुसार जाहिरात देऊन महाविद्यालयाचे प्रस्ताव मागविणे, महाविद्यालये आणि परिसंस्थाबाबतच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.