अखेर मुसळधारेची विश्रांती, मुंबईकरांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:26 AM2018-07-12T06:26:35+5:302018-07-12T06:26:53+5:30

मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला तब्बल चार दिवस झोडपलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी अखेर मुंबईत विश्रांती घेतली.

Finally, the rest of the monsoon, the relief of the Mumbaikars | अखेर मुसळधारेची विश्रांती, मुंबईकरांना दिलासा

अखेर मुसळधारेची विश्रांती, मुंबईकरांना दिलासा

Next

मुंबई - मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला तब्बल चार दिवस झोडपलेल्या मुसळधार पावसाने बुधवारी अखेर मुंबईत विश्रांती घेतली. पूर्व उपनगरात पडलेल्या तुरळक सरी वगळता पश्चिम उपनगर आणि मुंबई शहर बुधवारी कोरडेच होते. विशेषत: चार दिवस ढग दाटून आलेल्या मुंबईकरांना आज अखेर सूर्यनारायणाचे दर्शन झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.
मुंबईकरांची बुधवारची सकाळच पावसाविना झाली. चार दिवस सतत पाऊस पडल्यानंतर आज पाऊस नसल्याने मुंबईकरांना काहीसे चुकल्यासारखे झाले. पावसाचे ढग असले तरी प्रत्यक्षात पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईचे संथ झालेले जनजीवन वेगाने धावू लागले. लोकल नेहमीप्रमाणे वेळेवर नसल्या तरी रस्ते वाहतूक मात्र व्यवस्थित सुरू होती. काही ठिकाणची कोंडी सोडली तर वाहतूक वेगाने असल्याने मुंबईकरांची कोंडी झाली नाही.
पूर्व उपनगरात दुपारी १२ वाजेपर्यंत दाटून आलेल्या ढगांमुळे दमदार पाऊस कोसळेल, अशी चिन्हे होती. प्रत्यक्षात मात्र दुपारी १२नंतर येथे कडाक्याचे ऊन पडले. पश्चिम उपनगरात पावसाचे वातावरण असले तरी येथे पावसाने पाठ फिरवली होती. कडाक्याचे ऊन पडल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.
महत्त्वाचे म्हणजे दिवसभर पाऊस बेपत्ता असल्याने दुपार झाल्यानंतर येथे काहीसा उकाडा जाणवू लागला.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझडीच्या घटना सुरूच आहेत. मागील २४ तासांत १३ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. २४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ५२ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. सुदैवाने या दुर्घटनांत मनुष्यहानी झाली नाही.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात १२ आणि १३ जुलै रोजी काही ठिकाणी थांबून थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बुधवारी पावसाने उसंत घेतली. हीच संधी साधत हौशी मुंबईकरांनी मरिन ड्राइव्ह बीचवर गर्दी केली अन् पावसामुळे कुंद वातावरणासह प्रसन्न पहाटेची मजा लुटली.

Web Title: Finally, the rest of the monsoon, the relief of the Mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.