...अखेर भायखळा उड्डाणपुलावर रबलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:37 AM2018-07-15T01:37:33+5:302018-07-15T01:37:38+5:30
भायखळा-भारतमाता उड्डाणपुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर मनपा प्रशासनाने या ठिकाणी रबलिंग करण्याचे काम पूर्ण केले आहे.
मुंबई : भायखळा-भारतमाता उड्डाणपुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर मनपा प्रशासनाने या ठिकाणी रबलिंग करण्याचे काम पूर्ण केले आहे. लोकमतच्या वृत्तानंतर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मनपाला मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मनसेचे शाखाध्यक्ष नीलेश इंदप म्हणाले की, अवजड वाहनांसह दुचाकीस्वारांच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्याला लोकमतने वाचा फोडल्यानंतर मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. वाहतूक विभागासह मनपा प्रशासनाला ४८ तासांची मुदत देत मनसेने आंदोलनाची आखणी केली होती. मात्र मनपाचे स्थानिक वॉर्डचे सहायक पालिका आयुक्त किशोर देसाई यांनी तत्काळ कार्यवाही पूर्ण करत प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. अखेर उड्डाणपुलावर रबलिंगचे काम पूर्ण केल्याने मनसेने मनपाचे आभार मानले आहेत.
मनसेचे उपविभागाध्यक्ष संतोष नलावडे म्हणाले की, गुळगुळीत झालेल्या रस्त्यांमुळे वाहनांचे अपघात सत्र सुरू होते. मात्र मनपाने केलेल्या कामांमुळे कित्येक जीव वाचणार आहेत. तसेच अपघातांमुळे होणाºया वाहतूककोंडीतून दक्षिण मुंबईकरांची सुटका होणार आहे. दरम्यान, मनपाने विभागातील खड्ड्यांतूनही स्थानिकांची सुटका करण्याची मागणी नलावडे यांनी केली आहे. नाहीतर आता खड्ड्यांसाठी मनसेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.