Join us  

अखेर फडकला बालेकिल्ल्यावर भगवा

By admin | Published: February 25, 2017 3:46 AM

बालेकिल्ल्यातूनच हद्दपार झाल्यामुळे गेली पाच वर्षे चरफडणाऱ्या शिवसेनेला अखेर आपल्या गडावर पुन्हा भगवा फडकवता आला आहे़

मुंबई : बालेकिल्ल्यातूनच हद्दपार झाल्यामुळे गेली पाच वर्षे चरफडणाऱ्या शिवसेनेला अखेर आपल्या गडावर पुन्हा भगवा फडकवता आला आहे़ प्रतिष्ठेच्या दादर-माहीम मतदारसंघातून मनसेला हद्दपार करीत शिवसेनेने विजय खेचून आणला़ शेवटपर्यंत कडवी झुंज देणाऱ्या मनसेला मात्र येथे केवळ एका नगरसेवकपदावर समाधान मानावे लागले आहे़मराठी लोकवस्ती अधिक असलेल्या दादर-माहीम मतदारसंघात २०१२च्या महापालिका निवडणुकीत मनसेने झेंडा फडकवला. येथील सहा प्रभागांमध्ये मनसेचे वर्चस्व होते. तेव्हापासून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू होती. त्याचे फळ विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळाले. या यशानंतर शिवसेनेचा आत्मविश्वास या प्रभागांमध्ये वाढला़ त्यामुळे शिवसेनेने येथील प्रभागांमध्ये दिग्गजांना उतरवले़ २०१२च्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत २८ जागांवर निवडून येणारी मनसे गेल्या काही वर्षांमध्ये ढेपाळली़ याचा फायदा शिवसेनेला पुरेपूर झाला़मतदानाच्या दिवशी ज्येष्ठ शिवसैनिक रस्त्यावर उतरून मतदानासाठी सर्व नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणत होते़ दादरचे प्रभाग तसेही मराठीबहुल असल्याने मनसेचा जोर ओसरताच तेथे शिवसेना हाच अखेरचा पर्याय ठरतो़ निष्ठावान शिवसैनिकांच्या भावनिक हाकेला या मतदारांनी साथ दिल्याचे चित्र या निकालानंतर दिसून आले. (प्रतिनिधी)