कुलगुरू संजय देशमुखांची अखेर हकालपट्टी, मुंबई विद्यापीठातील निकाल गोंधळ भोवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:34 AM2017-10-25T06:34:15+5:302017-10-25T06:34:31+5:30
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली. विद्यापीठाच्या १६० वर्षांच्या इतिहासात कुलगुरूंवर बडतर्फीची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विद्यापीठ आणि कुलगुरूंवर टीकेची झोड उठली होती. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांकडून ‘कुलगुरू हटाव’च्या मागणीने जोर धरला होता. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठ कायद्यातील कलम ११ (१४) (ई) प्रमाणे अधिकाराच्या दुरुपयोगाचा ठपका ठेवत कुलगुरू संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकले आहे. विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत देशमुख यांनी आणली. पण, ती यशस्वीरीत्या राबविता आली नाही. निकाल उशिरा लागले, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले या कारणांवरून देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आल्याचे राजभवनातून सांगण्यात आले.
मार्च महिन्यात परीक्षा सुरू झाल्या. एप्रिलमध्ये संजय देशमुख यांनी सर्व उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यात येतील असे जाहीर केले. त्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली. पहिल्यांदा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने दुसºयांदा तीन कंपन्यांपैकी ‘मेरिट ट्रॅक’ कंपनीला कंत्राट दिले. या उशिरामुळे मे महिन्याच्या मध्यात उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि तपासणीला सुरुवात झाली.
प्राध्यापकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने उत्तरपत्रिका तपासणीत अनेक अडचणी येत होत्या. जून महिना संपत आल्यावरही निकाल जाहीर न झाल्याने राज्यपाल विद्यासागर राव यांनी लक्ष घातले. ४ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याची तंबी दिली. विद्यापीठाला ती मुदत पाळणे जमले नाही. त्यामुळे ३१ जुलैची दुसरी मुदत दिली. आॅगस्ट महिना उजाडल्यानंतरही निकाल जाहीर न झाल्याने ९ आॅगस्ट २०१७ रोजी कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती.संजय देशमुख यांनी या कारणे दाखवा नोटीसला तब्बल तीन हजार शब्दांचे उत्तर दिले. १९ सप्टेंबरला विद्यापीठाने ४७७ निकाल जाहीर केले. अजूनही तब्बल २४ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर व्हायचे आहेत. राज्यपालांच्या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. बडतर्फीच्या कारवाईबाबत संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण, संपर्क होऊ शकला नाही.
>१६० व्या वर्षी नवा इतिहास
मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६० वे वर्ष आहे. १६० वर्षांत कधीही राज्यपालांनी विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप केला नव्हता. पहिल्यांदाच निकाल उशिरा लागल्यामुळे कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली; आणि आता कुलगुरूंना काढून टाकण्यात आले आहे.
नवीन कुलगुरू कोण? : सध्या विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारींच्या खांद्यावर आहे. मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची हकालपट्टी झाल्यावर आता नवे कुलगुरू कोण? याविषयी उत्सुकता आहे.
‘मेरिट ट्रॅक’ कंपनीवर कारवाई? : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन निकालाच्या कामाचे कंत्राट ‘मेरिट ट्रॅक’ कंपनीकडे असल्याने या कंपनीवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.