मुंबई : विक्रोळीत तरुणाला नग्न करुन केलेल्या मारहाणीत दबावापोटी पोलिसांनी शिवसेनेचा गटप्रमुख सुरज गायकवाड याचे नाव वगळले होते. अखेर ‘लोकमत’च्या वृत्तानंतर शनिवारी गायकवाडलाही या गुन्ह्यात अटक केली. तसेच तक्रारदार तरुणाचा पुन्हा नव्याने जबाब घेत अधिक तपास केला जाणार असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीधर हंचाटे यांनी दिली. विक्रोळीच्या हरियाली व्हीलेज परिसरात कुटुंबियांसोबत राहत आकाशला (नावात बदल) कामाच्या बहाण्याने आरोपीने कमलेश शेट्टीच्या घरी नेले. तेथे नेऊन त्याला दारु पाजली. पत्नीची बदनामी का करतोस, असे विचारत त्याला नग्न करुन लाथा-बुक्क्यांनी, बेल्टने मारहाण केली. त्याच्या हातावर सिगारेटचे चटकेही दिले. या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तरुणाच्या जबाबात या सर्व घटनांचा उल्लेख असतानाही तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.ए.जमदाडे यांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर स्थानिकांच्या संतापानंतर ३२४,३२३,३४२,५०४,३४ भादवि कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची तसदी घेतल्याचे आकाशच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आकाश स्वत:हून त्यांच्या घरी गेला. तेथे मित्रांसोबत दारुपार्टीचा बेत उरकला. दरम्यान त्यांच्यात वाद होऊन मारहाण झाली. मात्र, आकाशच्या जबाबात त्याने आरोपी सचिन चौरे याने कामाचे कारण सांगून शेट्टीच्या घरी नेल्याचे म्हटले आहे. शिवाय व्हीडिओमध्येही आरोपीच्या हल्ल्यात त्याच्या गळा दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे स्पष्ट होते. एवढे सर्व पुरावे पोलिसांसमोर असतानाही प्रशासन गप्प का? असा सवाल आकाशने केला आहे. (प्रतिनिधी)न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशाराआरोपींच्या येत असलेल्या फोनमुळे आकाशने त्याचा फोन बंद केला आहे. तसेच त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. गुन्हा दाखल झाल्यापासून आकाश प्रचंड घाबरल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांच्या चौकशीची मागणी स्थानिकांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास स्थानिकांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.... त्यानंतरच पुढील कारवाईया प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला तक्रारदार याने दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रारदाराचा पुन्हा जबाब नोंदवून त्यातील माहितीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच यात काही कलमांची वाढही होण्याची शक्यता आहे.- श्रीधर हंचाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विक्रोळी पोलीस ठाणेव्हीडिओमध्ये तक्रारदार तरुणाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. हत्येचा प्रयत्न केल्यास ३०७ या कलमान्वये कारवाई होते. तसेच व्हीडिओही व्हायरल केले असल्याने आयटी अॅक्टनुसारही कारवाई होणे गरजेचे आहे. - अॅड. प्रकाश साळसिंगीकर
अखेर शिवसेनेच्या गटप्रमुखाला अटक
By admin | Published: April 16, 2017 3:03 AM