Join us

अखेर शिवसेना आमदाराचा राजीनामा खिशातून बाहेर, वाईट वागणुकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:22 PM

पक्षप्रमुख व जिल्हाध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे बाळू धानोरकर यांनी राजीनामा पाठविला आहे.

मुंबई - पक्षावर नाराज असलेल्या शिवसेनाआमदाराने अखेर आपल्या खिशातील राजीनामा बाहेर काढला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सुरेश नारायण उर्फ बाळू धानोरकर यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. राज्यात आणि केंद्रात सेना सत्तेत असूनही पूर्व विदर्भाच्या कार्यकर्त्यांना सेनेच्याच मंत्र्यांकडून अतिशय वाईट वागणूक दिली जाते, असा थेट आरोप बाळू धानोरकर यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. दरम्यान, शिवसेना नेते आणि परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावतेंनी युतीसंदर्भात बोलताना शिवसेना आमदारांचे राजीनामे खिशात असल्याचे म्हटले होते.

पक्षप्रमुख व जिल्हाध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे बाळू धानोरकर यांनी राजीनामा पाठविला आहे. मागिल काही दिवसांपासून काँग्रेसचे स्थानिक नेते त्यांना काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा निवडणूकीची उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीत प्रयत्नरत होते. मात्र यात त्यांना यात यश आले नाही. आता काँग्रेसची मिळो अथवा नाही. निवडणूक लढण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे. शिवसेनेकडून ते शक्य नाही म्हणून आपण आमदारकी व शिवसेना पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार बाळू धानोरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर धानोरकर यांनी राजीनामास्त्र बाहेर काढल्यामुळे शिवसेनेत होणाऱ्या आमदाराची नाराजी धानोरकर यांच्यारुपाने महाराष्ट्रासमोर आली आहे. नागपूरमधील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार धानोरकर यांनी शिवसेना मंत्र्यांचेच वाभाडे काढले होते. शिवसेनेचे विदर्भात संघटन नाही हे माहिती असतानासुद्धा पक्षाचा एकही मंत्री या भागाकडे लक्ष देत नाही. मग पक्ष कसा वाढेल, असा सवाल त्यांनी त्यावेळी केला होता. शिवसेनेचे मंत्री शिवसैनिकांचीच कामे करीत नाहीत. त्यामुळे सत्ता असूनही सेना विदर्भात माघारली आहे.

सेनेच्या 12 पैकी एकाही मंत्र्याचे जर काम असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईल. शिवसेनेच्या मंत्र्यांचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का, याचाही कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले होते. शिवसेना-भाजपा युतीनंतरही धानोरकर यांची नाराजी चांगलीच वाढली होती. सेनेने सत्तेतून बाहेर पडावे तरच 288 विधानसभेच्या आणि 48 लोकसभेच्या जागा लढवू शकू, असेही ते म्हणाले होते. 

दरम्यान, बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचे समजते. मात्र, त्यांचा काँग्रेस प्रवेश आणि उमेदवारीला स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. त्यातूनच मग बाळु धानोरकरांवर दाखल असलेल्या काही गुन्हयांची माहिती काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे. त्यामुळे बाळू धानोरकर यांचा काँग्रेस प्रवेश होणार नाही, अशी चिन्ह आहेत. मात्र, पुढील विचार न करता धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.  

टॅग्स :शिवसेनाआमदारराजीनामाविधानसभा