Join us

अखेर एसटीलाही आले अच्छे दिन...

By admin | Published: January 20, 2015 2:22 AM

एसटी महामंडळाला अनेक कारणांमुळे प्रत्येक महिन्यात मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत असतानाच आता याच एसटीचे अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

सुशांत मोरे ल्ल मुंबईएसटी महामंडळाला अनेक कारणांमुळे प्रत्येक महिन्यात मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागत असतानाच आता याच एसटीचे अच्छे दिन येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. डिसेंबर महिन्यात एसटीला कुठल्याही प्रकारचा तोटा झाला नसल्याचे सांगण्यात आले असून, याबाबत महामंडळात आनंदाचे वातावरण आहे. एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात असून, यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजना जरी केल्या जात असल्या तरी त्यात महामंडळाला यश येत असल्याचे फारच कमी दिसून येते. महामंडळाला तर दररोज अनेक कारणांमुळे मोठा तोटाही सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यावरही महामंडळाकडून भर दिला जात आहे. महामंडळाला अनेक कारणांमुळे दररोज साधारपणे दीड ते दोन कोटींचा तोटा होत आहे. हे पाहता महिन्याला ४0 ते ६0 कोटींच्या दरम्यान तोटा महामंडळाला होत असून, मोठे आर्थिक नुकसानच सोसावे लागत आहे. परंतु गेल्या वर्षभरात प्रवासी वाढविण्यावर भर देतानाच डिझेलचा खर्च कमी करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न, टायरची क्षमता वाढविण्यावर भर यासह तोटा होत असलेल्या प्रमुख कारणांचा शोध घेत त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे महामंडळाला चांगले यश आल्याचे या वेळी दिसून येत आहे. २0१३च्या एप्रिल ते नोव्हेंबरची २0१४च्या एप्रिल ते नोव्हेंबरशी तुलना करता या वेळी तोटा ५0 टक्क्यांनी कमी झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यापर्यंत तोटा कमी होत असतानाच डिसेंबर महिन्यात तर एसटी ‘तोटा’मुक्तच झाली. एसटीला डिसेंबर महिन्यात कुठलाही तोटा न झाल्यामुळे महामंडळात आनंदाचे वातावरण आहे. महामंडळाला डिसेंबर महिन्यात तोटा झालेला नसून ही आनंदाची बाब आहे. प्रवासी वाढविण्यावर भर देतानाच, होणारे नुकसान आम्ही टाळले आणि त्याचाच फायदा झाला. पुढेही तोटा होऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय खंदारे म्हणाले.