Join us

अखेर 'वंदे भारत'ला कल्याण स्टेशनवर थांबा, आमदार पाटलांच्या मागणीला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 2:36 PM

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई-साईनगर शिर्डीवंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना एकाच दिवशी हिरवा झेंडा दाखवत महाराष्ट्रातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला सुरूवात केली. भारतीय रेल्वेची ९वी आणि १०वी वंदे भारत एक्सप्रेस सिद्धेश्वर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रांना जोडली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी-हाय स्पीड एसी चेअर कार ट्रेन सेवा आहे. या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र, मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारतला कल्याण जंक्शनवर थांबा देण्यात आला नव्हता. त्यामुळे, मनसे आमदार राजू पाटील यांनी या ट्रेनला कल्याणमध्ये थांबा देण्याची मागणी केली होती. त्यास, आता मंजुरी मिळाली आहे.  

ट्रेन क्रमांक २२२२३ मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ६.२० वाजता सीएसएमटीहून सुटते आणि साईनगर शिर्डी येथे ५ तास २० मिनिटे घेऊन सकाळी ११.४० वाजता पोहोचते. सीएसएमटी निघणारी ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोड स्थानकावर थांबत होती.तर ट्रेन क्रमांक २२२२४ साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी येथून सायंकाळी ५.२५ वाजता सुटत असून ५ तास २५ मिनिटे घेत मुंबईला रात्री १०.५० वाजता पोहोचते. मात्र, या ट्रेनला कल्याण जंक्शनवर थांबा देण्यात आला नव्हता. त्यामुळे, कल्याणसह कर्जत-खोपोली या परसरात राहणाऱ्या नागरिकांनी मोठी गैरसोय झाली होती. यासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण जंक्शनवर थांबा देण्याचा प्रश्न लावून धरला होता. त्यानंतर, आता कल्याण जंक्शनवर वंदे भारत ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. मुंबईहून येणारी ट्रेन सकाळी ७.११ वाजता येते आणि ७.१३ वाजता निघते. तसेच, शिर्डीहून येणारी ट्रेन रात्री ९.४५ वाजता कल्याणला येते आणि ९.४७ वाजता मुंबईकडे रवाना होते. 

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. आमदार राजू पाटील यांच्यामुळेच वंदे भारतला कल्याण जंक्शनवर थांबा मिळाल्याचं मनसेनं म्हटलंय. तसेच, रेल्वेच्या प्रश्नावर ठाणे जिल्ह्यात सातत्याने आंदोलने व्हायची ही परंपरा खंडीत झाली होती, ती राजू पाटील यांच्यामुळे पुन्हा सुरू झाल्याचंही मनसेनं म्हटलं आहे. 

मुंबई ते साईनगर शिर्डीचे भाडे

मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार सीटसाठी अनुक्रमे ९७५ रुपये आणि १८४० रुपये मोजावे लागतील. या भाड्यात केटरिंगचा समावेश आहे. तुम्ही ऑन-बोर्ड केटरिंगची निवड न करण्याचे निवडल्यास, तुम्हाला चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार सीटसाठी अनुक्रमे ८४० रुपये आणि १६७० रुपये भाडे द्यावे लागेल. 

टॅग्स :मुंबईवंदे भारत एक्सप्रेसमनसेकल्याण