Join us

अखेर ‘त्या’ विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या

By admin | Published: September 12, 2015 3:54 AM

माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातील कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या (टी.वाय.बी.ए.) मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका बसला होता.

मुंबई : माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयातील कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या (टी.वाय.बी.ए.) मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका बसला होता. या विद्यार्थ्यांचा आॅनलाइन पद्धतीने ६ व्या सत्राचा निकाल चुकीचा दाखवण्यात आला होता. शिवाय ५व्या सत्राच्या पुनर्परीक्षेचा निकाल लावण्यात आला नव्हता. सुमारे दोन महिने रेंगाळलेले हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणताच अखेर मुंबई विद्यापीठाने या प्रकरणी तातडीने पावले उचलली आहेत. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी विद्यार्थ्यांना पाचव्या आणि सहाव्या सत्राच्या मूळ गुणपत्रिका सुपुर्द करण्यात आल्या आहेत.मुंबई विद्यापीठाकडून एप्रिल महिन्यात कला शाखेच्या तृतीय वर्षात (टी.वाय.बी.ए.) मॅथमॅटिक्स विषयाची परीक्षा घेण्यात आली. ७ आॅगस्ट रोजी सहाव्या सत्राचा निकाल आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. मात्र या निकालात सावळागोंधळ झाल्याने विद्यार्थ्यांना त्रास झाला. शिवाय वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली. नेमका हाच मुद्दा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. याची दखल रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांनी घेतली. आणि विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर टी.वाय.बी.ए. मॅथमॅटिक्स विभागाचे प्रमुख प्रा. राजेश्वर आंधळे यांनी विद्यापीठाशी संपर्क साधला. शिवाय कला शाखेच्या परीक्षा विभागाला चूक निदर्शनास आणून दिली. त्यानंतर शुक्रवारी विद्यार्थ्यांना पाचव्या आणि सहाव्या सत्राच्या मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. सोबतच या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. विद्यापीठाकडून चुका अपेक्षित नाहीत. त्यांनी तातडीने पावले उचलत मूळ गुणपत्रिका देऊ केली. परंतु तरीही माझे परदेशी शिक्षण या वर्षी होणार नाही, याची खंत आहे. त्यामुळे मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घेऊन मी भविष्यातील शिक्षणाबाबत निर्णय घेईन.- आदिती शेणवी, विद्याथीमी उच्च शिक्षणासाठी पुण्यात आहे. त्यामुळे निकालपत्र घेता आले नाही. मात्र उद्या मी मुंबईकडे रवाना होणार आहे. ‘लोकमत’ने हे प्रकरण उचलून धरल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे आभार.- अक्षय पवार, विद्यार्थी