...अखेर दहावीचा तिढा सुटला; नववी, दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:05 AM2021-05-29T04:05:55+5:302021-05-29T04:05:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर निकाल ...

... Finally the tenth left bitter; Evaluation based on marks of ninth, tenth | ...अखेर दहावीचा तिढा सुटला; नववी, दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन

...अखेर दहावीचा तिढा सुटला; नववी, दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर निकाल कसा लावला जाणार, यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धाेरण जाहीर केले आहे. त्यानुसार, दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के अंतर्गत मूल्यमापआनुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांनुसार देण्यात येतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हे मूल्यमापन धाेरण जाहीर केले.

शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाची पद्धत तयार करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, त्याचाच आधार घेत यंदाचे दहावीचे मूल्यमापन होईल.

* पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यर्थ्यांना असे मिळणार गुण

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी ते मंडळाच्या ज्या परीक्षांना बसले होते त्यापैकी उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेचे ८० पैकी प्राप्त गुणांच्या सरासरीएवढे गुण संगणकप्रणालीमार्फत देण्यात येतील, तर उर्वरित गुण अंतर्गत तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे देण्यात येतील. खासगी पुनर्परीक्षार्थींसाठी यापूर्वीच्या अंतिम इयत्तेत (५ वी ते ९ वी) प्राप्त एकूण गुणांची टक्केवारी लक्षात घेतली जाईल. खासगीरीत्या परीक्षेला बसणाऱ्यांच्या संपर्क केंद्रामार्फत घेतल्या गेलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, गृहकार्य, स्वाध्याय पुस्तिका, प्रकल्प यांचे ८० पैकी गुण देण्यात येतील, तर उर्वरित २० गुण अंतर्गत मूल्यमापनावर आधारित असतील.

* निकाल जूनअखेरपर्यंत होणार जाहीर

दहावीचा निकाल जूनअखेरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल, तसेच या निकालाच्या अभिलेखांची पडताळणी विभाग स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी करतील. शाळास्तरावर गैरप्रकार किंवा फेरफार झाल्यास शिस्तभंगासह दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

* असे आहे निकालाचे सूत्र

- विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन - ३० गुण

- दहावीचा गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन- २० गुण

विद्यार्थ्याचा नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल - ५० गुण

- म्हणजेच नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

* ...तर परीक्षा देता येईल

ज्या नियमित विद्यार्थ्यांना निकाल समाधानकारक वाटणार नाही त्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेंतर्गत लगतच्या २ परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी मिळेल. शिवाय या सर्व प्रक्रियेसाठी शाळांना माहिती देण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येईल. शिवाय गुण संकलनासाठी मंडळामार्फत संगणकप्रणालीही उपलब्ध करून देण्यात येईल. विभागीय आणि जिल्हास्तरावर शिक्षण विभागाकडून धोरणाच्या कार्यपद्धतीच्या माहितीसाठी स्वत्रंत हेल्पलाइन सुरू करण्यात येईल.

................................................

Web Title: ... Finally the tenth left bitter; Evaluation based on marks of ninth, tenth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.