लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एका महिलेने एक वर्षाच्या मुलीचे चर्चगेट भागातून अपहरण केले. मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखेने शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या मदतीने वांद्रे येथून मध्य प्रदेश आणि तेथून राजस्थान गाठले. तेथे दहा दिवस तळही ठोकला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. जयपूरच्या एका एटीएममधून मुलीला ताब्यात घेऊन अपहरण करणाऱ्या महिलेला अटक केली.
प्रीती ऊर्फ पायल लक्ष्मणसिंग (२३) असे या महिलेचे नाव असून, ती मूळची उत्तर प्रदेशची तर तिचे सासर जयपूरचे आहे. तिला मूल नसल्याने तिने बालिकेची चोरी केली.
मुलीची आई चर्चगेटला फुले विकते. तेथूनच आरोपी महिलेने मुलीचे अपहरण केले आणि लोकलने वांद्रे रेल्वे स्थानक गाठले. मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. पोलिसांनी मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
गुन्हे शाखा कक्ष १च्या पोलिस निरीक्षक रोहिणी पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. आरोपी महिला वांद्रे येथून मध्य प्रदेशला गेल्याचे फुटेजमध्ये दिसले. पोलिस तेथे गेले. मात्र आरोपी महिला मध्य प्रदेशहून जयपूर-राजस्थानला गेल्याचे कळताच पोलिस पथकाने तेथे मुक्काम ठोकून आठवडाभर शोध घेतला...त्याला अखेर यश आले.
एटीएममध्ये सापडली गुन्हे शाखेने स्थानिक खबऱ्यांना कामाला लावले आणि पोलिसांनाही माहिती दिली. बुधवारी स्थानिक खबऱ्याकडून एक महिला एका मुलीसह एटीएममध्ये राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यांनी मुलीचा फोटो मागवून ती अपहृत मुलगीच असल्याची खात्री केली. गुरुवारी पोलिसांनी मुलीला सुखरूप ताब्यात घेत महिलेला अटक केली. मुलगी पुन्हा कुशीत आल्याने कुटुंबीयांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.