मुंबई - राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण शनिवारी राजभवन येथे विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही उपस्थिती होती. याअंतर्गत राज्यातील प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी भाषण करताना राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांच्या मनातील खदखद सांगितली.
राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महाविकास आघाडीसह अन्य नेतेही राज्यपाल हटाव या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनीही आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका केली आहे. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटातील एका भरत गोगावले यांनी केला होता. आता, स्वत: राज्यपालांनी हे पद आपल्यासाठी दु:ख असल्याचं म्हटलं आहे.
“राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दुखं आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो”, अशी स्पष्टपणे भूमिका राज्यपाल कोश्यारी यांनी माडंली. तसेच “छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक जन्माला यावे, परंतू आपल्या घरात नाही, तर शेजारच्या घरात, अशी लोकांची भावना आहे”, असेही त्यांनी म्हटले. राज्यपालांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राज्यपाल लवकरच महाराष्ट्रातून जातील, त्यांना पदमुक्त केले जाईल, अशा चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, पर्यटन विभागामार्फत पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी हाती घेण्यात आलेला कार्यक्रम स्तुत्य आहे. अध्यात्माचे महत्त्व लक्षात घेता सध्याच्या काळात पर्यटनाबरोबरच तीर्थाटनही तितकेच महत्त्वाचे झाल्याचे सांगितले.