अखेर मालवणी येथील सुमारे ५००० रहिवाशांचा रेंगाळलेला पाणी प्रश्न अखेर सुटला
By मनोहर कुंभेजकर | Published: November 22, 2023 05:25 PM2023-11-22T17:25:42+5:302023-11-22T17:27:21+5:30
संपूर्ण वसाहतीतील जुन्या जलवाहिन्या महापालिकेकडून बदलून नव्या जलवाहिन्या बसविण्यात आल्या आणि रहिवाशांकरिता स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झाला.
मुंबई - मालाड पश्चिम मालवणी येथील गायकवाड नगर एम एच बी कॉलनीमधील सुमारे ५००० रहिवाशांना गेली अनेक वर्षे दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी येत होते.त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.संपूर्ण वसाहतीतील जुन्या जलवाहिन्या बदलणे गरजेचे होते. तसेच म्हाडाने पालिकेला देय असलेली सदर कामाची सुमारे ९६ लाख रुपयांची थकबाकी देखील प्रलंबित होती.
उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी म्हाडा व पालिका प्रशासनाशी सुमारे साडेचार वर्ष पाठपुरावा करून हा प्रश्न कायमचा सोडवला. त्यांनी येथील जलवाहिनीचा व्हॉल्व्ह ओपन करून पाणीपुरवठा सुरू केला.
संपूर्ण वसाहतीतील जुन्या जलवाहिन्या महापालिकेकडून बदलून नव्या जलवाहिन्या बसविण्यात आल्या व रहिवाशांकरिता स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने राहिवाशांनी आनंद व्यक्त केला. लोकमतने देखील या संदर्भात दि, १८ नोव्हेंबर २०२२ रोजी वृत्त दिले होते.
सोमवार दि, १५ नोव्हेंबर २०२२ रोजी नवीन पाण्याच्या पाईपलाईनचे कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते गायकवाड नगर बेस्ट डेपो, मालवणी गेट नं ८ समोर करण्यात आले होते.
२०१९ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून गोपाळ शेट्टी हे येथे प्रचारासाठी मालवणी ७ / ८ नंबर या परिसरात प्रचार करत होते. त्यावेळेला काही स्त्रियांनी अळीचा प्रादुर्भाव झालेल्या प्रदूषित पाण्याची बाटली दाखवत तक्रारी दिली की, हे पाणी आम्ही रोज पितो. त्या क्षणातच त्यांनी तेच अळीचा प्रादुर्भाव असलेले अस्वच्छ प्रदूषित पाणी प्यायले व म्हणाले जर तुम्ही हे पाणी रोज पीत असाल तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मलाही हे पाणी पिण्यास हरकत नाही. उपस्थित रहिवाश्यांना मोठा धक्काच बसला. गढूळ प्रदूषित किडेयुक्त पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावीन असे आश्वासन त्यांनी दिले होते.
महाडा व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधत बृहन्मुंबई महानगरपालिका सदर काम करणार असे नक्की झाले. तेवढ्यातच कोविड-19 चा काळ सुरू झाला व काम लांबणीवर गेले. विशेष म्हणजे म्हाडाकडून महापालिकेला सदर कामाचे सुमारे ९६ लाख रुपयांची थकबाकी देखील प्राप्त करून दिले अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.
उद्घाटन प्रसंगी युनूस खान, योगेश वर्मा, गणेश खणकर, दिलीप पंडित, निखिल व्यास, जया तिवाना, जॉन डेनिस, मंगेश चौधरी, जिल्हा, मंडळ, वॉर्ड स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, सदर कामाचा शासकीय पातळीवर विविध अधिकाऱ्यांचा ताळमेळ व समन्वय साधून सातत्यपूर्ण व यशस्वी पाठपुरावा सुधीर सरवणकर यांनी केला होता.