अखेर अभियंत्याचे निलंबन, महामंडळाची कारवाई; प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 02:50 PM2023-07-27T14:50:42+5:302023-07-27T14:52:04+5:30
सोशल मीडियावर व्हायरल होणारा बसचा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील आहे
मुंबई - राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजेच आपली सर्वसामान्यांची लाल परी नेहमीच चर्चेत असते. कधी प्रवाशांच्या सेवेत हजर झाली म्हणून तर कधी दुर्घटना घडली म्हणून. अनेकदा एसटी बसची झालेला दयनीय अवस्थाही तिच्या चर्चेला कारणीभूत ठरते. सरकारचे आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असते. अशाच एका बसचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला. त्यामध्ये, बसचे टप उडाल्याचे दिसून येते. काहींनी या बसचा व्हिडिओ शेअर करत महामंडळ आणि सरकारची खिल्ली उडवलीय. तर, काहींना गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. आता, महामंडळाने परिपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा बसचा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील आहे. त्यात, टप अर्धा उडालेला असतानाही ड्रायव्हर मोठ्या हिमतीने ही बस पुढे नेत आहेत. सुदैवाने ज्या रस्त्यावरुन ही बस धावताना दिसते, तो रस्ता चांगला आहे. आता, या बसप्रकरणी महामंडळाने पत्राद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अस म्हणत हे पत्र सोशल मीडियावरुन शेअरही करण्यात आलंय.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच ४०वाय ५४९४ ही गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत असतांना वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पुर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचे चलचित्र विविध समाज माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आले. यासंदर्भात सदर बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता शी.रा. बिराजदार (विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पूर्ण न करणे तसेच सदर वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतूकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे, त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होणे या कारणास्तव बिराजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
तसेच, यापुढे वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सुचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात, असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत, असे परिपत्रकच महामंडळाच्यावतीने काढण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही..! pic.twitter.com/RTd3mEEJxP
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) July 27, 2023
गडचिरोलीत बस हे उदाहरण ठरेल, पण महामंडळाच्या राज्यातील अनेक बस डेपोतील बस गाड्यांची दुर्दशा अशीच झाली आहे. त्यामुळे, सरकार याकडे गांभीर्याने पाहणार का, हाच खरा प्रश्न आहे.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळासाठी राज्य सरकार तब्बल ५ हजार नवीन बसेस खरेदी करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच माध्यमांत झळकली होती. त्या बस येतील तेव्हा येतील, पण महामंडळाच्या सध्याच्या बसची दुर्दशा पाहून प्रवाशांकडून सातत्याने संताप व्यक्त करण्यात येतो. कुठे बसला काचा नाहीत, कुठे सीटच नाही, कुठे सीट अर्धे फाटलेले असते, तर कुठे रस्त्यावरुन धावताना गाडीचा खडखडाट संगीतमय भासतो. त्यामुळे, प्रवाशी वर्गाकडून बसची अवस्था पाहून राग व्यक्त केला जातो.