लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही निवडणूक १० सप्टेंबरला पार पडणार असून, १३ सप्टेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. एकूण १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून, त्यापैकी पाच जागा खुल्या तर उर्वरित पाच जागा राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. तर २१ ऑगस्ट सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडेल. उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे अपील करण्यास २३ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २५ ऑगस्ट सायंकाळी पाचपर्यंतची मुदत आहे.
शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही गाजली मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर शिक्षक मतदारांमधून एकूण १० प्रतिनिधी निवडून देण्यासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टू)ला आठ जागांवर यश मिळाले आहे. तर एका जागेवर ‘मुक्ता’ संघटनेला एक आणि ‘मस्ट’ या प्राध्यापक संघटनांना एका जागेवर समाधान मानावे लागले होते. बुक्टूने सिनेटच्या सर्व म्हणजे १० जागा तर विद्यापरिषदेच्या सहापैकी तीन जागा लढविल्या होत्या. त्यापैकी सिनेटच्या आठ तर विद्यापरिषदेच्या तीन जागा जिंकून बुक्टूने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.