... अखेर ‘त्या’ ४०५ विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार
By admin | Published: July 2, 2015 11:38 PM2015-07-02T23:38:31+5:302015-07-02T23:38:31+5:30
राज्य परिवहन मंडळाच्या रायगड (पेण) विभागीय कार्यालयाच्या गेल्या दोन वर्षांच्या नाकर्तेपणामुळे पेण तालुक्यातील वरसई या दुर्गम गावातील पेण एज्युकेशन सोसायटीच्या कै.पु.न.गोडसे
जयंत धुळप, अलिबाग
राज्य परिवहन मंडळाच्या रायगड (पेण) विभागीय कार्यालयाच्या गेल्या दोन वर्षांच्या नाकर्तेपणामुळे पेण तालुक्यातील वरसई या दुर्गम गावातील पेण एज्युकेशन सोसायटीच्या कै.पु.न.गोडसे विद्यामंदिरात परिसरातील साडेपाच किमी अंतरावरील आष्टे, मोहिली, खालसा, घोटे, उत्तेश्वरवाडी आदी गावांतील २०६ मुले व १९९ मुली अशा एकूण ४०५ विद्यार्थ्यांना दररोज जाता-येता ११ किमी अंतर चालून शाळेत यावे लागत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने गेल्या मंगळवारी (२३जून) सर्वप्रथम उजेडात आणल्यावर, यंत्रणा खडबडून जागी झाली आणि शुक्रवारी या मार्गावर एसटी बस सुरु करण्याचे नियोजन राज्य परिवहन मंडळाच्या रामवाडी येथील रायगड विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती एसटीचे वाहतूक निरीक्षक संजय हर्डिकर यांनी दिली आहे.
गेल्या मंगळवारी हे वृत्त प्रसिद्ध होताच, रायगड (पेण)एसटी विभागाचे मुख्य नियंत्रक अजित गायकवाड यांनी त्याची तत्काळ दखल घेवून, याबाबत कार्यवाहीचे तत्काळ आदेश दिले. शुक्रवारी (२६जून) वरसई ते घोटे या रस्त्याचे राज्य परिवहन मंडळाच्या रस्ते सुरक्षा निरीक्षकांनी तत्काळ सुरक्षितता विषयक सर्वेक्षण केले. त्यामध्ये या रस्त्यावरील तीन ते चार ठिकाणे धोकादायक निष्पन्न झाली. या धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करुन, ती बिनधोक करण्याची जबाबदारी खरेतर रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची होती. परंतु शालेय विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबविण्याच्या हेतूने घोटे-जांभूळवाडी गट ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण दिवेकर यांनी पुढाकार घेवून, ही धोकादायक ठिकाणे केवळ दोन दिवसांत दुरुस्त केली आणि सोमवारी (२९जून) रस्ता एसटी वाहतुकीस सुरक्षित झाला. रस्ता एसटी वाहतुकीस सुरक्षित झाला असला तरी प्रत्यक्ष एसटी सुरु होण्यासाठी किमान आठवड्याचा कालावधी लागेल अशी माहिती एस.टी.चे वाहतूक निरीक्षक संजय हर्डिकर यांनी दिली.