मुंबई : महापालिका आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यातील वादाचा फटका मिठी नदीच्या सफाईकामाला बसला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिका मुख्यालयात आयुक्त अजय मेहता यांच्या दालनासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले. अखेर आयुक्तांच्या आश्वासनानंतर सायंकाळी उशिरा त्यांनी आपले उपोषण सोडले.कुर्ला येथे मिठी नदीच्या शेजारी एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत आहे. २०१२मध्ये संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना वापरलेले दगड, विटा, माती आजही त्याच जागी पडून आहे. हा ढिगारा हटविण्याची मागणी स्थानिक वारंवार करीत आहेत. मात्र, अद्याप काम रखडलेलेच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबल्यास नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.कुर्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. खान यांनी हे डेब्रिज उचलण्यासाठी पालिकेला एक आठवड्याची मुदत दिली होती. मात्र, पालिकेने याकडे लक्ष दिले नसल्याने त्यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले. त्यांच्याबरोबर नगरसेवक कप्तान मलिकही आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर आयुक्तांनी सायंकाळी ७नंतर भेट दिली. या बैठकीत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त मेहता यांनी दिल्याचे खान यांनी सांगितले.पत्रकारांना मज्जावया आंदोलनाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांना भेटण्यास आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्याचीही घटना या वेळी घडली.राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेदराष्ट्रवादी खान उपोषणाला बसल्या असताना गटनेत्या राखी जाधव यांना प्रशासनाने पाठविलेले मिठी नदीच्या ९० टक्के सफाईच्या पत्राने गोंधळ निर्माण केला. यामुळे खान गटनेत्यांवरच बरसल्याने पक्षांतर्गत मतभेद उघड झाले.
...अखेर मिठी नदीतील डेब्रिज उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:43 AM