मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या यंदाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेत शासन निर्णय असूनही मुंबई अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण डावलले असून, वंचित मुलांना प्रवेशापासून दूर ठेवले आहे. हा अनाथ विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडसर निर्माण करणारा असल्याची टीका प्रहार विद्यार्थी संघटनेने केली होती. यावर कार्यवाही करत आरक्षण देण्यासंदर्भातील परिपत्रक तत्काळ जारी केले आहे.मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांच्या स्वाक्षरीने मुंबई विद्यापीठाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये सर्व महाविद्यालये, तसेच संलग्न महाविद्यालयांना आरक्षणाच्या सूचना दिल्या आहेत.
बारावीचा निकाल लागल्यानंतर २९ मे, २०१९ पासून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशासाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया मुंबई विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली. या ऑनलाइन प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रियेत अनाथ मुलांसाठी लागू असणाऱ्या एक टक्का समांतर आरक्षणाचा कोठेही उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे ६ जानेवारी, २०१६ रोजी महिला व बालविकास विभागाने अनाथ विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी व पदव्युत्तर शिक्षणात एक टक्का आरक्षण (समांतर) देऊ केले़ असे असताना मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या प्रवेशाच्या परिपत्रकात मात्र अनाथांना आरक्षण नाकारले असल्याचा आरोप प्रहार विद्यार्थी संघटना महाराष्ट्र अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी केला. याची चौकशी करून विद्यापीठावर कारवाई करावी, अशी मागणीही टेकाडे यांनी केली होती.