अखेर वर्सावे पूल पूर्णपणे खुला
By admin | Published: May 19, 2017 12:59 AM2017-05-19T00:59:47+5:302017-05-19T00:59:47+5:30
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सावेच्या जुन्या पुलाची दुरुस्ती व भार पेलण्याची क्षमताचाचणी पूर्ण झाल्यानंतर हा पूल गुरुवारी सकाळपासून हलक्या
- लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सावेच्या जुन्या पुलाची दुरुस्ती व भार पेलण्याची क्षमताचाचणी पूर्ण झाल्यानंतर हा पूल गुरुवारी सकाळपासून हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून होत असलेल्या प्रचंड वाहतुक कोंडीपासून वाहनचालक- नागरिकांची सुटका झाली आहे. पुलावर दोन मार्गिका करण्यात आल्या असून एकीतून मोठ्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.
जुन्या पुलावरुन ४९ टनांपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. त्यांना भिवंडीमार्गेच ये-जा करावी लागणार आहे. प्राधिकरणाने वाहतूक पोलिसांना पत्र देऊन पुल खुला झाल्याची तसेच वाहतुकीसाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली आहे. पुलावर दोन मार्गिका करण्यात आल्या असून एका मार्गिकेला केवळ लहान वाहने जावीत म्हणून वर लोखंडी कमान टाकली आहे, तर दुसऱ्या मार्गिकेतून मोठ्या वाहनांना जाता येणार आहे.
४९ टनांचा भार पूल पेलू शकणार!
ब्रिटीश कंपनी रॅमबोलने सुचवल्यानुसार तडा गेलेल्या गर्डरला उच्चप्रतीच्या लोखंडी फ्रेमचा (ट्रस) आधार दिला गेला. शिवाय अंतर्गत अन्य दुरुस्ती कामेसुध्दा पूर्ण करण्यात आली. दुरुस्तीपूर्वी १५ टनापेक्षा जास्त अवजड वाहनांची वाहतूक जुन्या पुलावरुन बंदच ठेवावी लागणार असल्याची शक्यता प्राधिकरणाने वर्तवली होती. या दुरुस्तीनंतर पुलाची भारक्षमता चाचणी करण्यासाठी चार दिवस पूल वाहतुकीसाठी बंद होता. या चाचणीत ४९ टनाचा भार पूल पेलू शकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.