अखेर आम्हाला आज स्वातंत्र्य मिळाले...; कलम ३७७ च्या निर्णयावर विभिन्न प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 06:08 AM2018-09-07T06:08:59+5:302018-09-07T06:09:25+5:30
प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख आहे. समाजातील लोकांनी आपली विचारधारा, मानसिकता बदलायला हवी.
मुंबई : प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख आहे. समाजातील लोकांनी आपली विचारधारा, मानसिकता बदलायला हवी. त्यामुळे समलिंगी संबंध हा गुन्हा नाही असा महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला आहे. एकीकडे समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता हे देशाच्या सार्वभौम असल्याच्या विश्वासात भर घालणारे ठरले आहे तर दुसरीकडे काहींनी पाश्चात्त्य संस्कृतीचा दुष्परिणाम म्हणत तर काहींनी खेदजनक निर्णय म्हणून निषेध नोंदवला आहे. त्यामुळे आजच्या निर्णयानंतर या समूहामध्ये तरी आनंदाचे वातावरण आहे, सोबतच बाकीच्या समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत याचा आढावा ‘लोकमत’ने घेण्याचा प्रयत्न केला.
नेटकऱ्यांकडून समलैंगिकतेच्या निर्णयाचे स्वागत
समलैंगिक संबंध आता गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. कलम ३७७ ने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवले होते. मात्र गुरुवारच्या निकालाने समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने निकाल जाहीर करताच एलजीबीटी म्हणजेच लेस्बियन (समलैंगिक स्त्रिया), गे (समलैंगिक पुरुष), बायसेक्शुअल (उभयलिंगी पुरुष आणि स्त्रिया) आणि ट्रान्सजेंडर्स यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या समाजाला शुभेच्छा देण्यासाठी देशातील नागरिकांनी सोशल मीडियाचा आधार घेत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. टिष्ट्वटरवरून #सेक्शन ३७७, #लव्ह इज लव्ह, #सुप्रीम कोर्ट, #लव्ह विन, #प्राइड, #एलजीबीटी, #सेक्शन ३७७ व्हर्डीक असे हॅशटॅग वापरून मोठ्या संख्येने मेसेज व्हायरल होत होते. टिष्ट्वटर इंडिया या टिष्ट्वटरच्या आॅफिशियल अकाउंटच्या आठ वाजताच्या अहवालानुसार मागील १२ तासांत ३ लाख टिष्ट्वटरच्या माध्यमातून एलजीबीटीच्या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. टिष्ट्वटर इंडियाने एलजीबीटी समाजाचे अभिनंदनदेखील केले आहे. प्रसिद्ध व्यक्ती, सेलीब्रिटी आणि नागरिकांनी निर्णयाचे स्वागत केले. बहुतेक युजर्सनी फेसबुकवरून एलजीबीटीचा प्राइड फ्लॅग पोस्ट केला होता. व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे निर्णयाचे स्वागत करणारे मेसेज ठेवले जात होते.
गुगलकडून विशेष डूडल
गुगलने इंद्रधनुष्य रंगी झेंड्यांचा फोटो ठेवला होता. या झेंड्याला एलजीबीटी प्राइड फ्लॅग किंवा गे प्राइड फ्लॅग म्हणून ओळखले जाते. एलजीबीटी समाजाच्या मोर्चात हा झेंडा वापरला जात असून या समाजाचे प्र्रतिनिधित्व याद्वारे केले जाते.
सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांबद्दल दिलेला निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली हे उत्तम झाले. मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहिला तर हा योग्य निर्णय आहे. न्यायालयाने मान्यता दिल्याने आता समाजही मान्यता देईल. फक्त थोडा अवधी लागेल.
- हर्षल जाधव, विद्यार्थी, साठे महाविद्यालय
सर्वाेच्च न्यायालयाचा समलैंगिकता गुन्हा नसल्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. संविधानिक मूल्यांचे जतन करण्याची परंपरा पुन्हा एकदा सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवली. तृतीयपंथीना नवीन स्वातंत्र्य मिळाले आहे. समाजात त्यांना योग्य स्थान मिळाले आहे. समाज नागरिक अधिकाराची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यामध्ये मतदान करण्याचा अधिकार, राहण्याचा, फिरण्याचा आदी अधिकार या समाज घटकाला मिळणे अपेक्षित आहे.प्त - सचिन बनसोडे, मुंबई अध्यक्ष, छात्रभारती संस्था
न्यायालयाचा निकाल पूर्वीच लागणे अपेक्षित होते. कलम ३७७मधील मुख्य भाग हा अनैसर्गिक संबंधवर मुख्य आक्षेप होता. दोन व्यक्तींमधील प्रेम आणि त्यांच्यातील लैंगिकता आणि लैंगिकतेची भूक ही त्यांची आपापसांतील भावना असते. यात सरकारने किंवा अन्य कोणी हस्तक्षेप करता कामा नये. समाज १०० टक्के साक्षरतेकडे जात असल्याने अशा प्रकारचे कायदे बाजूला होत आहेत. व्यक्ती-व्यक्तीमधील लैंगिकता हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. जनजागृती करण्याची प्रक्रिया मोठी आहे. - संजय रानडे, प्राध्यापक, मुंबई विद्यापीठ
समलैंगिक समुदायासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे, कारण समलैंगिक व्यक्तींना समाजात मिळणारी हीन दर्जाची वागणूक, बघण्याचा दृष्टीकोन हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बदलेल हे नक्कीच. समलैंगिकांच्या दृष्टीने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगला निर्णय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
- भूषण रूमडे, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी
अखेर आम्हाला स्वातंत्र्य मिळाले असून आज आमचा स्वातंत्र्यदिन आहे. मात्र इथून खरी लढाई सुरू झाली आहे. एक व्यक्ती म्हणून अस्तित्व मान्य करण्यात आले होते मात्र खºया अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला आणि आमच्या समूहाला आज मिळाले आहे. आता यापुढे त्याच्या अंमलबजावणीबद्दल सध्या तरी बोलणार नाही आणि या यशाचा आनंद घेणार आहे. आज एलजीबीटीच्या सदस्यांच्या मानवी मूल्यांना खºया अर्थाने पाठिंबा मिळाला आहे.
- दिशा शेख,
एलजीबीटी कार्यकर्त्या
३७७ बाबत न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे, त्या दृष्टीकोनातून व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा आधुनिक दृष्टीकोन पाहता तो जरी योग्य वाटत असला, तरी धर्मशास्त्रात समलैंगिक संबंधांना पाप मानले गेले आहे. आपल्या धर्माचा उद्देश असा आहे की विशेषत: लैंगिक संबंध ठेवताना प्रजेची उत्पत्ती हे एक मात्र लैंगिक संबंधामध्ये सांगितले गेले आहे आणि समलैंगिक संबंधामध्ये प्रजेची उत्पत्ती नाही, केवळ भोगवाद आणि सुखप्राप्ती आहे. समलैंगिक संबंध हे सर्व विकृतीच्या दिशेने चालले आहे. हिंदू धर्म हा निसर्गाला मानणारा आहे, तसेच नैसर्गिक संबंधांना तो मान्यता देतो. जनतेला आवाहन आहे की, समलैंगिक संबंध व्यक्तिगत पातळीवर योग्य वाटले, तरी धर्म शास्त्रीय दृष्टीकोनातून पाप आहे.
- चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
न्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र निकालाला उशीर झाला असे वाटत आहे. न्यायालयातील निकाल पानावरच राहता कामा नये. या कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हायला हवी. जेणेकरून समाजात त्यांना स्थान मिळेल. परंतु लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक असून निर्णयाचा स्वीकार समाजाने केला पाहिजे. समलैंगिक जोडप्याचे लग्न होईल, मुले दत्तक घेतील; पण या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित होईल. समाज या मुलांना योग्य वागणूक देईल का? सामान्य स्तरावर निर्णयाविषयी जनजागृती व्हायला हवी. समलैंगिक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष सवलतींची गरज आहे.
- संकेत वरक, मुंबई विद्यापीठ
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खेदजनक आहे. देशातील काळा दिवस असल्याचे आमच्याकडून पाळण्यात येत आहे. आम्ही समलैंगिकतेच्या विरोधात आहोत. अनैसर्गिक लैंगिकता आणि अनैसर्गिक कृत्य यावर आमचा आपेक्ष असून यामुळे मानवता संपृष्टात येईल. लैंगिकता हा विषय नैसर्गिक आहे. धार्मिक ग्रंथात अनैसर्गिक संबंध ठेवणाºयांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे. त्यामुळे या निर्णयास आमचा विरोध असून लोकशाहीच्या मार्गाने सर्व धर्मातील लोक, हिंदुत्ववादी संघटना, इस्लामिक संघटना, ख्रिश्चन संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहोत. देशातील सर्वसामान्य व्यक्ती या निर्णयाचा स्वीकार करणार नाही.
- नौशाद उस्मान, इस्लाम अभ्यासक
समाजातील विविध स्तर आणि क्षेत्रांत क्रांती घडत असताना, एलजीबीटी समुदायासाठी हा निर्णय मोठा आहे. यामुळे भारतातही वैचारिक क्रांती घडून आली आहे आणि अजून परिवर्तन होईल अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. जिथे यासंदर्भात चर्चेसाठीही लोक घाबरत होते तेथे आज या विषयाला न्याय मिळाला आहे. यामुळे आता या समूहाच्या समाजातील स्थानाला आणखी बळकटी आणता येईल. शिक्षण, आरोग्य, समाजातील स्थान अशा विविध विषयांवर काम करता येईल.
- पल्लव पाटणकर,
एलजीबीटी कार्यकर्ता
आज आम्हाला स्वतंत्र भारतात खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले आहे. यापुढे समलैंगिक नाती जोपासणाºया समाजातल्या व्यक्तींचा विचार मानवी अधिकारांच्या दृष्टीकोनातून होईल आणि त्यांच्या हक्कांवर अतिक्रमण, अन्याय होणार नाही अशी आशा आहे.
- अशोक रावकवी,
संस्थापक, हमसफर ट्रस्ट
आणि एलजीबीटी कार्यकर्ता