मुंबई : राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, कर्जमाफीवरुन अडचणीचे प्रश्न येत आहेत, बुलेट ट्रेनला ३० हजार कोटी रुपये द्यायचे आहेत, जो येतो तो आमच्या विभागाच्या बजेटला कात्री लावू नका म्हणतो. उत्तरं तरी किती द्यायची आणि कोणाकोणाला द्यायची. त्यापेक्षा मौनव्रत स्वीकारलेले बरे, असे म्हणत राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलणेच बंद केले आहे. कोणाला काही सांगायचे असेल तर ते त्यांचे म्हणणे कागदावर लिहून देत आहेत. वित्तविभागात देखील ‘चिठ्ठी आयी है...’ असा परवलीचा शब्द दोन दिवसात लोकप्रिय झाला.नेमके काय घडले याची शहानिशा केली असता खरे कारण वेगळेच असल्याचे समजले. राज्याच्या तिजोरीवर आलेल्या अतिभारामुळे नव्हे तर त्यांच्या स्वत:च्या स्वरयंत्रावर आलेल्या अतिताणामुळे त्यांना डॉक्टरांनी ‘बोलू नका’ असा सल्ला दिला आहे. त्यांच्या कार्यालयात चौकशी केली असता त्यांच्या घशाला इनफेक्शन झाल्याचे सांगण्यात आले. ‘आमचं काम करुन टाका, एवढचं बोलायला लावा ना, असा लकडा त्यांच्या कार्यालयात आलेल्या काही कार्यकर्त्यांनी लावला असता, ‘अहो- साहेब, वहिनीसाहेबांना सुध्दा चिठ्ठी लिहून बोलत आहेत. तुमचं काय घेऊन बसलात, जरा समजून घ्या...’ अशी समजूत काढून अधिकारी या कार्यकर्त्यांची रवानगी करत आहेत. किमान ८ ते ९ तारखेपर्यंत ‘बोलायचे नाही’, असे डॉक्टरांनी त्यांना बजावले असल्यामुळे मुनगंटीवार यांचे काम सांकेतिक भाषेत आणि चिठ्ठी लिहून चालू आहे.काहींच्या मते मुनगंटीवारांचे हे राजकीय मौनव्रत आहे. पुढच्या आठवड्यात खातेबदल व मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात मुनगंटीवार यांच्याकडे आणखी काही खाती दिली जातील, अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यातील काही मंत्र्यांविषयीची नाराजी या बदलामागे असेल, असेही सांगितले जाते. त्यामुळे या काळात न बोललेलेच बरे, असा धोरणी विचार या मौनामागे असल्याची राजकीय चर्चा आहे. मुनगंटीवार यांनी सौभाग्यवतींना आयुष्यभरात जेवढी पत्रं लिहीली नसतील त्यापेक्षा जास्त चिठ्ठ्या त्यांनी गेल्या दोन दिवसांत लिहिल्याचेही एका अधिकाºयाने सांगितले आहे.
वित्तमंत्र्यांनी धारण केले मौनव्रत! चिठ्ठीद्वारे संभाषण, हे राजकीय मौन असल्याची चर्चा
By अतुल कुलकर्णी | Published: November 04, 2017 2:08 AM