मुंबई : सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मद्वारे सामान्यांना आर्थिक सल्ला देणारे इन्फ्लुअर्स आता भांडवली बाजार नियामक संस्था असलेल्या सेबीच्या रडारवर आले आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुअर्स असलेल्यांच्या माध्यमातून गैरसमज पसरविणारे सल्ले किंवा योजनांचा प्रसार केला जातो, असे निदर्शनास आल्यानंतर आता या इन्फ्लुअन्सर्ससाठी काही नियमावली निश्चित करता येते का, याची चाचपणी करण्यात येत आहे.
सध्याच्या घडीला विविध विषयांची माहिती देणारी लाखो यू ट्यूब, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सॲप अशी चॅनल्स आहेत, ज्या माध्यमातून अनेक सोशल मीडिया इन्फ्लुअर्स हे स्टाइल, फॅशनपासून ते हॉटेल, कुकिंग किंवा शेअर बाजारातील टिप्स, म्युच्युअल फंड योजनांची माहिती, गुंतवणुकीचा सल्ला देत असतात. इतर क्षेत्रांच्या तुलनेत अर्थकारण आणि आर्थिक गुंतवणूक यासाठी मात्र सेबीचे काही नियम निश्चित आहेत. अर्थकारणात असलेल्या कंपन्यांना कोणतीही जाहिरात अथवा माहितीचा प्रसार करताना सेबीने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, सोशल मीडियावर तसे कोणतेही नियंत्रण नाही. चुकीच्या सल्ल्याने गुंतवणूकदार चुकीच्या योजनेला बळी पडू नये अथवा त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याकरिता सेबीने आता सोशल मीडियावर प्रसार नियमांचा विचार सुरू केला आहे.
इन्फ्लुअर्स म्हणजे काय?सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांवरून प्रेक्षकांना विविध प्रकारची माहिती लोक देत असतात. ज्या लोकांना ही माहिती आवडते, ते लोक अशा मंडळींनी चॅनल्स किंवा हँडल्स फॉलो करतात. हळूहळू या चॅनल किंवा हँडलचे फॉलोअर्स वाढत जातात आणि मग काही हजार अथवा काही लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला गेला की, अशा लोकांना सोशल मीडिया इन्फ्लुअर्स असे संबोधले जाते.
चुकीच्या सल्ल्यांचा ताेटासन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सोशल मीडिया इन्फ्लुअर्सद्वारे सेबीच्या आर्थिक विषयक प्रचलित नियमांचे उल्लंघन झाल्याच्या ४१५ घटना निदर्शनास आल्या आहेत. यापैकी ४३ घटना चुकीच्या आर्थिक सल्ल्यांच्या आहेत तर ३७२ घटना या क्रिप्टोकरन्सी संदर्भातील आहेत.तसेच, सध्याच्या घडीला टेलिग्राम या ॲपद्वारे शेअर ट्रेडिंगचे अनेक ग्रुप्स असून त्याद्वारे एखाद्या शेअरची टीप देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक होत असल्याचे प्रकारही उजेडात आले आहेत.