श्रीकांत पांगरकरची शस्त्रसाठ्यासाठी आर्थिक रसद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:42 AM2018-08-21T02:42:22+5:302018-08-21T02:42:44+5:30
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक; २८ पर्यंत पोलीस कोठडी; राज्यात विविध भागांत केली होती रेकी
मुंबई : नालासोपाऱ्यात जप्त केलेल्या स्फोटकांप्रकरणी अटक केलेला शिवसेनेचा जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर हा शस्त्रसाठ्यासाठी पैसे देत होता, अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) चौकशीत समोर आली आहे. त्याने राज्यातील विविध भागांत रेकीही केली होती. अधिक तपासासाठी विशेष सत्र न्यायालयाने त्याला सोमवारी २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हिंदुत्ववादी कार्यकर्ते वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या चौकशीत जालनाच्या श्रीकांतचे नाव समोर आले. त्यानुसार, एटीएसने त्याला ताब्यात घेत रविवारी अटक केली. त्याच्याकडून ३ मोबाइल, १ पेनड्राइव्ह, हार्डडिस्क, पुस्तके तसेच कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. हा सर्व दस्तऐवज तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
एटीएसने आतापर्यंत केलेल्या कारवाईत हस्तगत केलेला शस्त्रसाठा तसेच आरोपींनी अन्य ठिकाणी दडवून ठेवलेल्या शस्त्रसाठ्यासाठी पांगरकरनेपैसे पुरविल्याची माहिती समोर आली. त्याने हा पैसा कोठून व कसा आणला? तसेच त्याने रेकी केलेल्या ठिकाणांबाबत एटीएस तपास करत आहे.
पांगरकरच्या घरी छापा टाकण्याचीही आवश्यकता नसून बँक खात्याची माहिती पोलीस काढू शकले असते. हार्डडिस्क आणि पेनड्राइव्हची माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून त्याची माहिती मिळाली असती. त्यामुळे पांगरकरच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.
अन्य तिघेही २८ आॅगस्टपर्यंत कोठडीत आहेत. पांगरकरकडे पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत. त्याचा अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाशीही संबंध आहे का, या दिशेनेही अधिक तपास
सुरू आहे.