मुंबई
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांमध्ये संशोधन वृत्तीला चालना आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी लघु संशोधन प्रकल्पांना आर्थिक साहाय्य म्हणून मुंबई विद्यापीठाने पहिल्या टप्प्यांतर्गत एकूण मंजूर निधीच्या ७० टक्के निधी म्हणजेच २ कोटी ९४ लाख ५४ हजार एवढा निधी या आठवड्यात वितरित केला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी विविध शाखांतर्गत शिक्षकांनी सादर केलेल्या प्रकल्पांपैकी एकूण ११७९ लघु संशोधन प्रकल्पांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मानव्य विद्या शाखेतील १७४, वाणिज्य २४५, विज्ञान ३९९ आणि अभियांत्रिकीसाठी ३६१ एवढ्या प्रकल्पांचा समावेश आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन संस्कृतीच्या वृद्धीसाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशोधन वृत्तीला चालना मिळावी, संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी विद्यापीठामार्फत दरवर्षी शिक्षकांना आर्थिक साहाय्य दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी विद्यापीठामार्फत शिक्षकांचे लघु संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी ॲानलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. विविध विद्या शाखांसाठी प्राप्त प्रस्तावांची समितीमार्फत छाननी करून एकूण ११७९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित शिक्षकांना धनादेशाद्वारे निधी देण्यात येणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.