Join us

जनगणनेच्या अगोदर छोट्यामोठ्या सेवा, व्यवसाय, उद्योगांची आर्थिक जनगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:20 AM

जनगणनेमुळे मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवा वर्गाला तिमाहीसाठी रोजगार निर्माण होणार

मुंबई : महाराष्ट्रभर गावागावात आर्थिक गणना सुरू झाली आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यात आर्थिक जनगणना एक जानेवारीपासून सुरू झाली आहे. सदर सर्वेक्षणाचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर (सी एमसी) ई-गव्हर्नन्सला देण्यात आले आहे. या जनगणनेमुळे मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवा वर्गाला तिमाहीसाठी रोजगार निर्माण होणार आहे. डिसेंबरमध्ये एक आठवडाभर वांद्रे पूर्व येथे आर्थिक जनगणना सर्वेक्षण करणाऱ्या गणकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उपनगरातील सुमारे २ हजार ५०० गणकांना सीएससीतर्फे मुंबई उपनगर जिल्हा व्यवस्थापक गजानन पाटील व लक्ष्मण काळे यांनी मार्गदर्शन केले.प्रथमच पेपरलेस मोबाइल अ‍ॅपवर गणना होणार आहे. आर्थिक गणनानुसार, फेरीवाले, लघु-व्यवसाय यांसह देशाच्या भौगोलिक सीमेत स्थित सर्व व्यावसायिक एकके/आस्थापने मोजली जाणार आहेत. या गणनेमार्फत व्यवसाय स्थापना, मालकी, त्यात गुंतलेले लोक इत्यादींच्या आर्थिक क्रियांबद्दल महत्त्वाची माहिती शासनाला मिळेल. या गणनेद्वारे प्राप्त केलेली माहिती सामाजिक-आर्थिक विकासासाठी एक व्यापक योजना तयार करण्यात उपयुक्त सिद्ध करू शकते. या आर्थिक गणनेत कृषी क्षेत्राव्यतिरिक्त, आर्थिक गणनेमध्ये कुटुंबांमध्ये कार्यरत लहान उपक्रम, वस्तू व सेवांच्या उत्पादन किंवा वितरणात गुंतलेल्या युनिटसह सर्व आस्थापनांचा समावेश असणार आहे. सातव्या आर्थिक जनगणनेत सर्व प्रकारचे सेवा उद्योग, व्यवसाय प्रत्येक घराघरात जाऊन आणि व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षित गणकांमार्फत केली जाणार आहे, अशी माहिती साद प्रतिसाद संस्थेचे संदीप सावंत यांनी दिली.केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक जनगणना देशात घेतली जात आहे. भारतातील सहावी आर्थिक जनगणना सन २०१३ मध्ये झाली, तर पहिली आर्थिक जनगणना १९७७ मध्ये झाली. दुसरी १९८०, तिसरी १९९०, चौथी १९९८, पाचवी २००५ मध्ये झाली.सदर जनगणना करते वेळी गणकांना गृहनिर्माण संस्थांचे रखवालदार गेटवर अडवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या समिती सदस्यांनी लक्ष घालून योग्य त्या सूचना त्यांच्या रखवालदारांना द्याव्यात. जनगणनेस सहकार्य करावे, अशी सूचना द्यावी.