मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती गुटगुटीत! विविध बँकांत ८६ हजार कोटींच्या एफडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:04 AM2024-01-13T10:04:37+5:302024-01-13T10:05:37+5:30
मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी ८६ हजार ४०१ कोटींवर गेल्या आहेत.
मुंबई : देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या मुंबई पालिकेच्या मुदत ठेवी ८६ हजार ४०१ कोटींवर गेल्या आहेत. ही रक्कम ३२ विविध बँकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात ठेवण्यात आली आहे.
या मुदत ठेवींची २०२१-२२ या आर्थिक वर्षाशी तुलना केली असता २०२२-२३ या आर्थिक वर्षात यामध्ये ५ हजार २८९ कोटींची घट दिसून आली. मात्र, पालिकेच्या ठेवी कमी झाल्या असे दिसून येत असले तरी विविध विकासकामे आणि महामंडळ, उपक्रमांना अदा केलेल्या रकमांचा विचार करता पालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा दावा यापूर्वीच प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
पालिकेच्या या मुदत ठेवींमधून आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यात येतात. तसेच विविध विकासकामांसाठी कंत्रादारांकडून घेतलेल्या अनामत रकमांचा या ठेवींमध्ये समावेश असतो. मुदत ठेवींमधील रक्कम ही कंत्राटदारांकडून स्वीकारण्यात आलेल्या अनामत रकमेच्या स्वरूपातील असून, कंत्राट कामे आणि त्यांचा दोष दायित्व पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्याकडून स्वीकारण्यात आलेली अनामत रकमेच्या स्वरूपातील रक्कम त्यांना परत करावी लागते. त्यामुळे मुदत ठेवींची संख्या अधिक वाटत असली, तरी ज्याप्रकारे विकासकामे पूर्ण होती, त्याप्रमाणे ही रक्कम दिल्यानंतर मुदत ठेवींचा आकडा भविष्यात आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
या बँकांमध्ये ठेवी :
पालिका प्रशासनाकडून मागील ५ वर्षांत बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, युको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक अशा विविध बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवल्या आहेत.
मुदत ठेवी कमी झाल्या कारण...
८ मे २०२० पालिकेकडे ७९ हजार ११५ कोटी रुपये इतकी मुदत ठेवींची रक्कम होती.
३१ मार्च २०२२ रोजी ९१ हजार ६९० कोटी रुपये मुदत ठेवींची रक्कम होती.
३० जून २०२३ रोजी ८६ हजार ४६७ कोटी रुपये इतकी आहे.
पालिकेने शासन धोरणानुसार एमएसआरडीसीला प्रलंबित हिश्श्याची २ हजार ५० कोटी रुपये रक्कम वर्ग केली आहे.
बेस्ट उपक्रमाला २ हजार ५६७ कोटी रुपये रक्कम वर्ग केली आहे.
३१ मार्च २०२३ अखेर भांडवली कामांवर १४ हजार कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.