मुंबई : राज्य सरकारच्या महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. आणि याची दखल घेत कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला.
उत्पन्नाचे नवे स्रोत शोधायला हवेत, स्वतःकडे असलेली सर्व संपत्ती आणि त्याचे मूल्य ही माहिती गोळा करून आपले बाजारमूल्य वाढवावे, बाह्ययंत्रणा कडून घेतलेले कर्ज कमी करून भविष्यातील कर्जासाठी पत वाढवावी, असा कृती कार्यक्रम (ॲक्शन प्लान) राबविण्याचे आदेशही राऊत यांनी तीनही वीज कंपन्याना दिले.
बाह्य स्रोतांकडून घेतलेले कर्ज आधी चुकते करावे म्हणजे आर्थिक स्थिती व पत सुधारेल. वित्तसंस्थाकडून अधिक कर्ज मिळेल. जादा व्याजदर द्यावे लागत असणाऱ्या कर्जाऐवजी कमी व्याजदराच्या कर्जाना प्राधान्य द्यावे. कर्जाची फेररचना करून घ्यावी. तिन्ही वीज कंपन्यांच्या मालकी हक्क असलेल्या जमिनींची नोंद करणे, या जमिनी नावावर करणे, तसेच तिन्ही वीज कंपन्यांनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधणे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी गरजेचे असल्याचे राऊत यांनी सांगितले.