मुंबई : ताडदेव येथील हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकत बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या चौकडीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून साडेसोळा लाख किमतीची ब्रँडेड कंपनीच्या नावे असलेली बनावट घडाळे जप्त करण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केट येथील मुसाफीरखाना परिसरात बनावट घड्याळ विक्री करणाऱ्या दुकानदाराला मुंबई एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ७८ हजार ३९० रुपये किमतीची घडाळे जप्त करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ ताडदेव येथील प्रसिद्ध हिरा पन्ना शॉपिंग सेंटरमधील एका शॉपमध्ये बनावट घड्याळांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री याठिकाणी छापा टाकला. या कारवाईत १६ लाख ४६ हजार किमतीची बनावट घड्याळे मिळाली आहेत. त्यांनी ही घड्याळे कुठून व कशी मिळवली? यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांची ही कारवाई सुरू होती.