‘कोरोना’नंतरचा काळ आर्थिक संकटाचा; काटकसरीने वागा, बचत करा- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:56 AM2020-03-31T02:56:39+5:302020-03-31T06:22:39+5:30
राज्य सरकार चांगले काम करत असताना त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकल्या पाहिजेत, त्या ऐकल्या नाहीत तर लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो.
मुंबई : कोरोनाशी लढा तर आपण देऊच, पण त्यानंतर येणारा काळ आर्थिकदृष्टीने अत्यंत कठीण राहणार आहे. येणारे दिवस काटकसरीने काढावे लागतील, बचत करावी लागेल, विकासदर दोन टक्क्यांपर्यंत येईल असे सांगितले जात आहे. तेव्हा त्यावर कशी मात करायची याचा आत्तापासून विचार आणि नियोजन करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
जनतेशी संवाद साधताना सोमवारी त्यांनी अनेक मुद्दे मांडले. या संकटातूनही आपण बाहेर पडू, पण त्यानंतर येणाऱ्या परिस्थितीचे आर्थिक परिणाम सगळ्यांना भोगावे लागणार आहेत म्हणून आजपासूनच वायफळ खर्च थांबवा, उत्पादकता कशी वाढवता येईल, खर्च कमी कसे करता येतील याचे नियोजन करा, असा सल्ला खा. पवार यांनी दिला.
राज्य सरकार चांगले काम करत असताना त्यांनी सांगितलेल्या सूचना ऐकल्या पाहिजेत, त्या ऐकल्या नाहीत तर लॉकडाऊनचा
कालावधी वाढू शकतो, असेही ते म्हणाले. आज अनेक लोक नफेखोरी करताना दिसतात, पण ही कमाईची वेळ नाही. लोकांना मदत करण्याची वेळ आहे. पोलिसांना कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका आणि सरकारच्या समंजसपणाला कोणीही दुबळेपणा समजू नये. तशी वेळ आलीच तर सरकार कठोर कारवाई करायलाही मागेपुढे पहाणार नाही, असेही पवार यांनी सुनावले.
काही दवाखाने, हॉस्पिटल बंद आहेत. काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली आहे, ही गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे माझे सहकारी दिवसरात्र सेवा देत आहेत. अन्य डॉक्टरही काम करत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवू नये. दवाखान्यांचे दरवाजे बंद करू नका, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
दिलेल्या सूचनांचे पालन करुया...
दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. जमेची गोष्ट एकच आहे ती म्हणजे काही हॉस्पिटलमधून सेवा चांगली दिल्याने रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, वाढती लोकसंख्याही चिंताजनक बाब आहे. पाश्चिमात्य देशात विशेषत: अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करूया, असे आवाहन शरद पवार यांनी केले.