वेतन मिळत नसल्याने विमानतळावरील कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:26 AM2020-07-29T01:26:56+5:302020-07-29T01:27:00+5:30

काम ठप्प होण्याची भीती : तत्काळ तोडगा काढण्याची आवश्यकता

Financial crisis on contract workers at the airport due to non-receipt of wages | वेतन मिळत नसल्याने विमानतळावरील कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट

वेतन मिळत नसल्याने विमानतळावरील कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल)च्या कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळाले नसल्याने कोरोनाच्या साथीमध्ये या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. वेतनाचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर विमानतळावरील कंत्राटी काम ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे.
विमानतळ व परिसरात सुमारे पाच ते सहा हजार जण तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी अनेकांना कामावरून कमी करण्यात आले आहे, तर अनेकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमआयएएल व त्यांच्या कंत्राटदारांकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाचे वेतन देण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विमानतळावर इतर सेवा पुरवणाºया सेवा पुरवठादारांची प्रलंबित देयके अद्याप देण्यात आलेली नसल्याने या पुरवठादारांनाही आर्थिक संकट भेडसावत आहे.
विमानतळ व परिसरात कार्यरत असलेल्या या कंत्राटी कामगारांमध्ये सुरक्षारक्षक, ट्रॉली कामगार, लोडर, स्वच्छता कर्मचारी, चालक, कारकुनी काम करणारे कर्मचारी आदींचा समावेश आहे. याबाबत वॉचडॉग फाउंडेशनने तक्रार केली असून यामध्ये त्वरित मार्ग काढून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस अल्मेडा, गॉडफ्रे पिमेंटा व इतरांनी सरकार व प्रशासनाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे.
एमआयएएलचे प्रमोटर असलेल्या जीव्हीके ग्रुपविरोधात सध्या चौकशी सुरू असल्याने एमआयएएलची बँक खाती गोठवली असल्याची माहिती आहे. मात्र त्याचा फटका गरीब कामगारांना बसू नये अशी अपेक्षा पिमेंटा यांनी व्यक्त केली.
मुंबई विमानतळामध्ये एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे सव्वीस टक्के शेअर आहेत. त्यामुळे सरकारने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून कर्मचाºयांना न्याय मिळवून द्यावा, असे पिमेंटा म्हणाले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने व डीजीसीएने या प्रकरणाची दखल घेऊन कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.

स्विगीने ३५० कर्मचाºयांना कामावरून काढले
मुंबई : फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगीने पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून, ३५० कर्मचाºयांना सोमवारी कामावरून कमी करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मेपासून स्विगीमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. मे महिन्यात मुख्यालय आणि विविध शहरांतील ११०० कर्मचाºयांना कामावरून काढण्यात आले होते. कंपनीचे उत्पन्न अर्ध्यावर आले आहे. दुर्दैवाने ३५० कर्मचाºयांची कपात करावी लागत आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे़

Web Title: Financial crisis on contract workers at the airport due to non-receipt of wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.