Join us

वेतन होत नसल्यानेे मुंबई विमानतळावरील कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट,  काम ठप्प होण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 6:32 PM

कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळाले नसल्याने कोरोनाच्या साथीमध्ये या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

 

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) च्या कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून नियमित वेतन मिळाले नसल्याने कोरोनाच्या साथीमध्ये या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. वेतनाचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर विमानतळावरील कंत्राटी काम ठप्प होण्याची भीती वर्तवली जात आहे. 

विमानतळ व परिसरात सुमारे पाच ते सहा हजार जण तीन शिफ्ट मध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी अनेकांना कामावरुन कमी करण्यात आले आहे तर अनेकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही त्यामुळे त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  एमआयएएल व त्यांच्या कंत्राटदारांकडून  कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामाचे वेतन देण्यास टाळाटाळ होत असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.  विमानतळावर इतर सेवा पुरवणाऱ्या सेवा पुरवठादारांची प्रलंबित देयके अद्याप देण्यात आलेली नसल्याने या पुरवठादारांना देखील आर्थिक संकट भेडसावत आहे.  विमानतळ व परिसरात कार्यरत असलेल्या या कंत्राटी कामगारांमध्ये सुरक्षा रक्षक,  ट्रॉली कामगार,  लोडर,  स्वच्छता कर्मचारी, चालक,  कारकुनी काम करणारे कर्मचारी आदींचा समावेश आहे. 

याबाबत वॉचडॉग फाऊंडेशनने तक्रार केली असून यामध्ये त्वरित मार्ग काढून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. फाऊंडेशन चे विश्वस्त निकोलस अल्मेडा,  गॉडफ्रे पिमेंटा व इतरांनी सरकार व प्रशासनाने ही समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे. एमआयएएलचे प्रमोटर असलेल्या जीव्हीके ग्रुप विरोधात सध्या चौकशी सुरु असल्याने एमआयएएलची बँक खाती गोठवली असल्याची माहिती आहे मात्र त्याचा फटका गरीब कामगारांना बसू नये अशी अपेक्षा पिमेंटा यांनी व्यक्त केली.  मुंबई विमानतळामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया के सव्वीस टक्के शेअर आहेत. त्यामुळे सरकारने यामध्ये त्वरित हस्तक्षेप करुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे पिमेंटा म्हणाले. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने व डीजीसीए ने या प्रकरणाची दखल घेऊन कार्यवाही करावी असे ते म्हणाले. 

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमानतळमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक