फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर्स ‘सेबी’च्या रडारवर; सामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:46 AM2023-09-05T06:46:01+5:302023-09-05T06:46:08+5:30
कंपन्यांवरही कारवाईचा प्रस्ताव
मुंबई : आर्थिक गुंतवणूक योजना सादर करणाऱ्या कंपन्यांच्या गुंतवणूक योजनांची माहिती आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना दणका देण्याचे संकेत भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या ‘सेबी’ने दिले असून, यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे संकेत दिले आहेत.
सद्य:स्थितीत अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आर्थिक गुंतवणूक योजना सादर करणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घेत त्यांच्या योजनांचे प्रमोशन सोशल मीडियावरून करताना दिसतात. मात्र, अनेक इन्फ्लुअन्सर्सना या विषयाची नीट माहिती नसते. परिणामी, त्यांच्याकडून एखाद्या योजनेचा चुकीच्या पद्धतीने प्रसार होण्याची शक्यता असते आणि याचा फटका मात्र सामान्य गुंतवणूकदाराला बसू शकतो. त्यामुळे हे टाळण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तर दुसरीकडे, अनेक इन्फ्लुएन्सर्सनी आपण कोणत्या कंपनीच्या कोणत्या उत्पादनाचा प्रसार करत आहोत, याची माहितीही जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यातर्फे होणारा हा व्यवसाय बाजारासाठी निश्चित केलेल्या नियमांचा भंग असल्याचे निदर्शनास आल्यावर सेबीने कारवाईचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत केवळ इन्फ्लुएन्सर्सच नाहीत तर त्यांना ज्या कंपन्यांनी काम दिले आहे त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत सेबीने दिले आहेत.
सेबीप्रमाणे अलीकडे आयकर विभागानेही इन्फ्लुएन्सर लोकांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. एखाद्या उत्पादनाच्या प्रसारासाठी इन्फ्लुएन्सर्स किमान १० हजार ते कमाल २५ लाख रुपये मानधन घेतात. मात्र, त्यातील बरेचसे उत्पन्न ते दडवत असल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले. त्यानंतर अलीकडेच देशातील काही प्रमुख इन्फ्लुएन्सर्सवर विभागाने छापेमारी करत कारवाई केली होती.