वित्तीय संस्था, ई-कॉमर्स कंपन्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:07 AM2021-03-25T04:07:23+5:302021-03-25T04:07:23+5:30
ट्रायची नाराजी, आवश्यक बाबींची पूर्तता करीत नसल्याची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ...
ट्रायची नाराजी, आवश्यक बाबींची पूर्तता करीत नसल्याची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नव्याने लागू केलेल्या लघुसंदेश नियमावलीच्या (एसएमएस रेग्युलेशन) अंमलबजावणीबाबत काही वित्तीय संस्था आणि ई-कॉमर्स कंपन्या उदासीन असल्याचे दिसून येत आहे. वारंवार सूचना देऊनही या कंपन्यांकडून या नियमावलीच्या अनुपालनाबाबत हालचाल केली जात नसल्याने ट्रायने नाराजी व्यक्त केली आहे.
दूरसंचार कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या ‘बल्क मेसेज’ सुविधेचा गैरफायदा घेऊन ग्राहकांना ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. त्यावर अंकुश आणण्यासाठी १९ जुलै २०१८ रोजी लघुसंदेश नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्याची सूचना सर्व दूरसंचार कंपन्या आणि व्यावसायिक उपभोक्त्यांना देण्यात आली. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी ८ मार्च २०२१ रोजी या नियमावलीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, संबंधित व्यावसायिक वापरकर्त्यांनी या नियमावलीत नमूद केलेल्या बाबींची पूर्तता न केल्याने त्यांनी पाठविलेले लघुसंदेश ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्यास सात दिवसांची स्थगिती देण्यात आली होती.
त्यानंतरही बऱ्याच बँका, वित्तीय कंपन्या आणि व्यावसायिक वापरकर्त्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याने ट्रायने नाराजी व्यक्त केली आहे. या बाबींची पूर्तता होत नाही तोपर्यंत ग्राहकांना बँकांचे व्यवहार, ओटीपी किंवा अन्य महत्त्वाचे संदेश प्राप्त होण्यात अडचणी येणार आहेत. दरम्यान, ट्रायने ही बाब रिझर्व बँकेच्या निदर्शनास आणून संबंधित वित्तीय कंपन्यांना ‘एसएमएस रेग्युलेशन’संदर्भात आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे आदेश देण्यास सांगितले असल्याचे समजते.
...................
‘एसएमएस’ची होणार चाळणी
नव्या लघुसंदेश नियमावलीनुसार वित्तीय संस्था, ई-कॉमर्स कंपन्या किंवा व्यावसायिक आस्थापनांनी एखादा संदेश ग्राहकाच्या मोबाइलवर पाठविल्यास आधी दूरसंचार कंपन्या त्याची चाळणी करतील. त्यात दिलेल्या मजकुराची शहानिशा केल्यानंतरच संबंधित मेसेज ग्राहकांपर्यंत पाठविला जाईल. मेसेज संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्यास तो ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार नाही. त्यामुळे आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल, असे ट्रायने म्हटले आहे.