आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 10:53 AM2021-12-04T10:53:24+5:302021-12-04T10:53:43+5:30
Anandrao Adsul:
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी ईडी करत आहे.
मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीनात अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सिटी सहकारी बँकेतील ९८० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांची चौकशी करण्याकरिता समन्स बजावले आहे.
विशेष म्हणजे, अडसूळ यांच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सिटी सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात कथित अनियमिततेसाठी आयपीसी अंतर्गत विश्वासभंग, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला.
त्यांनतर ईडीने चौकशीसाठी अडसूळ यांना तीन समन्स बजावले. मात्र, अडसूळ यांनी त्यास उत्तर दिले नाही. अँजिओप्लास्टी केल्याने आपण समन्सला उत्तर देऊ शकलो नाही, असे अडसूळ यांनी म्हटले. तसेच आपल्याला समन्स का बजावण्यात आले, हे स्पष्ट करणारे एकही कागदपत्र ईडीने आपल्याला दिले नाही. तपास यंत्रणेपुढे चौकशीला गेलो तर ते आपल्याला अटक करतील, अशी भीती अडसूळ यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.
ईडीने अडसूळ यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने म्हटले की, आतापर्यंत केलेला तपास पाहता अडसूळ यांची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे.