Join us

१२ शेल कंपन्यांतून झाला आर्थिक गैरव्यवहार; यशवंत जाधवप्रकरणी प्राप्तिकर विभागाचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 5:36 AM

यशवंत जाधवप्रकरणी आता ईडीही एन्ट्री घेऊन तपास करू शकते, असे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :  महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्याकडे प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत १२ शेल कंपन्या प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. याच कंपन्यांतून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला असून, त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. यामध्ये अंधेरी येथील पत्ता देण्यात आलेल्या एका कंपनीचा समावेश आहे.

गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय, तसेच ५ सिव्हिल कंत्राटदारांसह ३३ ठिकाणी छापेमारी केली. अजूनही त्यांची शोधमोहीम सुरू आहे. यादरम्यान एकूण २ कोटींच्या रकमेसह १० बँक खात्यांवर प्राप्तिकर विभागाने निर्बंध आणले आहे. महत्त्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल दस्ताऐवज जप्त करत चौकशी सुरू आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात आरोप असलेल्या कोलकत्ता आणि यूएईमधील बनावट कंपन्यांसह एकूण १२ शेल कंपन्यांबाबत माहिती मिळाली आहे. याच कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. त्यामुळे या कंपन्यांमध्ये कोण-कोण भागीदार होते, नेमके किती आर्थिक व्यवहार झाले, याबाबत प्राप्तिकर विभागाकडून तपास सुरू आहे.

ईडीची एन्ट्री... 

एका प्रकरणात ईडीने यशवंत जाधव यांच्या निकटवर्तींयांपैकी एक मानल्या जाणाऱ्या बिमल अग्रवाल विरोधात अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल केला होता. प्राप्तिकर विभागाने यशवंत जाधव यांच्याशी संबंधित छापेमारी दरम्यान अग्रवाल यांच्याही मालमत्तांवर छापेमारी केली. त्यांच्याजवळून आयकर विभागाने काही रक्कम जप्त केली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. त्यामुळे अग्रवाल आणि जाधव यांच्यातील व्यवहार समोर येत असल्याने ईडीही त्यांच्याकडे तपास करू शकते, असे समजते.

टॅग्स :यशवंत जाधवइन्कम टॅक्सअंमलबजावणी संचालनालय