- सीमा महांगडे
मुंबई : कोकण विभाग पुरातन बौद्ध लेण्यांनी समृद्ध असून त्यांच्या संवर्धनासाठी शासनाने आर्थिक तरतुदीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आरोग्य केंद्र व इतर सुविधा उपलब्ध केल्यास स्थानिक पर्यटनालाही चालना मिळेल. कोकणातील तब्ब्ल ४०० बौद्ध लेण्यांचा अभ्यास करून या अशा शिफारशी आपल्या शोधनिबंधात नमूद करून चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयात शिकवणाºया प्राध्यापक ज्ञानेश्वर कदम यांनी मुंबई विद्यापीठातून आपली पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. कोकणातल्या बौद्ध लेणी या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक असून तेथील लेण्यांमध्ये जैन, शैव, बौद्ध पंथांच्या लेणींचा समावेश आहे.
भारताला १२०० लेण्यांचा इतिहास असल्याचा उल्लेख महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या गॅझेटमध्ये आहे. इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या ज्ञानेश्वर कदम यांना मुळातच स्थापत्यकला, वास्तू या विषयांत रस असल्याने आणि आपल्या संशोधनासाठी समाज, कोणी व्यक्ती यापेक्षा काहीतरी वेगळा विषय निवडावासा वाटल्याने त्यांनी बौद्ध लेण्यांवर संशोधन करण्याचे ठरवले. त्यांनी १३ आॅक्टोबर २०१३ रोजी आपल्या पीएच.डी.साठी नोंदणी केली होती. मात्र तब्ब्ल ४०० हून अधिक लेण्यांचा खेड, रत्नागिरी, कान्हेरी, रायगड आणि अशा बºयाच ठिकाणी जाऊन अभ्यास करण्यात त्यांना ५ वर्षांचा कालावधी लागला.
बौद्ध लेणी हे महाराष्ट्राचे वैभव आहे़ मात्र या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाचीकिंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या लेण्यांचे संवर्धन व जतन ही काळाची गरजअसल्याचे त्यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये अधोरेखित केले आहे.
यासाठी त्यांनी कोकणातील भौगोलिक परिस्थिती, तेथील ऐतिहासिक राजवट, घराणेशाही, सोबतच बौद्ध धर्माचा अभ्यास केला. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत ८४ हजार स्तूपांची निर्मिती केल्याने त्याचाही अभ्यास त्यांनी केला. अखेर ११ एप्रिल २०१८ ला त्यांनीआपला शोधनिबंध सादर केला आणि ११ जानेवारीच्या मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात त्यांना पीएच.डी. बहाल करण्यात आली.