मधुमेही विद्यार्थ्यांना आर्थिक बळ
By admin | Published: August 20, 2015 12:55 AM2015-08-20T00:55:35+5:302015-08-20T00:55:35+5:30
जन्मत: मधुमेहाची लागण झालेल्या सहा वर्षाच्या रेश्माला (नाव बदले आहे) रोज इन्सुलिन घेऊन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवावे लागेत. रेश्माच्या वडिलांचे निधन झाल्यावर आई
मुंबई : जन्मत: मधुमेहाची लागण झालेल्या सहा वर्षाच्या रेश्माला (नाव बदले आहे) रोज इन्सुलिन घेऊन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवावे लागेत. रेश्माच्या वडिलांचे निधन झाल्यावर आई डबे करुन घर चालवते. टाईप-१ डायबेटिस असलेली अनेक मुले आजाराशी लढा देत असतानाच प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत आहेत. अशांच्या शैक्षणिक भरारीसाठी आता त्यांच्या पंखांना आर्थिक बळ मिळणार आहे.
केईएम रुग्णालयाचा डायबेटिस विभाग आणि नोवो नॉर्डिक्स एज्युकेशन फाऊंडेशनच्या (एनएनईएफ) वतीने टाईप १ डायबेटिस असणाऱ्या मुलांना स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. या स्कॉलरशीपसाठी १७ मुलांची निवड करण्यात आली आहे. एका वर्षासाठी या मुलांना १० हजार रुपये दिले जाणार आहेत. या रकमेतून ते शिक्षणाच्या बरोबरीनेच पूरक असे संगणकाचे, इतर कलांचे शिक्षण घेऊ शकतील, केईएम रुग्णालयाचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश शिवणे यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात सध्या १८ वर्षाखालील १७० मुले टाईप १ डायबेटिसचे उपचार घेत आहेत. याचबरोबरीने रुग्णालयाबाहेरील १५० मुलांना मोफत इन्सुलिन देण्यात येत आहे. या सर्वांना रुग्णालय आणि एनएनईएफच्या माध्यमातून मोफत उपचार दिले जात आहेत. २००८ -०९ पासून सायन रुग्णालयात हा उपक्रम सुरु आहे, असे विभागप्रमुख डॉ. नलिनी शहा यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली असते. पण, काहींची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसते. आजार आणि शिक्षणाचा खर्च न परवडत नसल्यास काहींना शिक्षण सोडण्याची वेळ येते. या विद्यार्थ्यांवर अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.